भावाच्या शेतात गेलेल्या महिलेवर वाघाने केला हल्ला; मदतीसाठी धावले मजूर

चंद्रपूर । भावाच्या शेतात सुरू असलेली धान कापणी बघण्यासाठी गेलेल्या बहिणीवर वाघाने हल्ला केल्याची घटना घडली आहे. कांताबाई रामदास चलाख (वय ६०) असे जखमी महिलेचे नाव असून तिला उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवण्यात आले आहे.
पोंभूर्णा वनपरिक्षेत्राअंतर्गत येत असलेल्या चेकहत्तीबोळी शेतशिवारात बोर्डा बोरकर येथील देवेंद्र कुनघाडकर यांचे शेत आहे. सध्या शेतात धान कापणी सुरू आहे. भाऊबीजेसाठी आलेली बहीण कांताबाई या शेतात धान कापणीचे काम बघण्यासाठी गेल्या. मात्र शेतात मजूर धान कापणीत गुंतले असताना दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक कांताबाई यांच्यावर हल्ला केला. वाघाच्या हल्ल्यानंतर कांताबाई यांनी आरडाओरड केल्यानंतर शेतातील मजुरांनी वाघाच्या दिशेने धाव घेतली. मजुरांची गर्दी बघून वाघाने तिथून पळ काढला. मात्र या हल्ल्यात कांताबाई गंभीर जखमी झाल्या. गंभीर अवस्थेत त्यांना उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र पोंभूर्णा येथे दाखल करण्यात आले. दरम्यान, शेतात शिरलेल्या वाघाने महिलेवर केलेल्या हल्ल्यानंतर या परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून हल्ला करणाऱ्या वाघाला जेरबंद करण्यात यावे अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

You May Also Like