ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचं करोनाने निधन

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचे नुकतेच कोरोनामुळे निधन झाले आहे. किशोर नांदलस्कर यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यांना ठाण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.

महेश मांजरेकर यांच्या ‘वास्तव’ या चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. किशोर यांना अभिनयाचा वारसा त्यांचे वडील खंडेराव यांच्याकडून मिळाला. ते नाटकांमध्ये स्त्री भूमिका करत असत. किशोर यांनी १९६०-६१ च्या सुमारास ‘आमराई’ या नाटकात काम केलं. हेच त्यांचं पहिलं नाटक ठरलं. त्यानंतर त्यांनी ‘विठ्ठल फरारी’, ‘नथीतून मारला तीर’, ‘सुंदरा मनामध्ये भरली’ अशा नाटकांमधून काम केलं. १९८० च्या सुमारास ते दूरदर्शनच्या ‘गजरा’, ‘नाटक’ अशा कार्यक्रमांमध्येही सहभागी झाले होते.

किशोर नांदलस्कर यांनी आत्तापर्यंत सुमारे ४० नाटके, २५ हून अधिक मराठी आणि हिंदी चित्रपट आणि २० हून अधिक मालिकांमधून काम केले. ‘नाना करते प्यार’, ‘सारे सज्जन’, ‘शेजारी शेजारी’, ‘हळद रुसली कुंकू हसले’ अशा अनेक चित्रपटातील त्यांच्या भूमिका लोकप्रिय ठरल्या. ‘चल आटप लवकर’, ‘भ्रमाचा भोपळा’, ‘पाहुणा’, ‘श्रीमान श्रीमती’, ‘भोळे डॅम्बीस’, ‘वन रूम किचन’ आदी नाटकांमधून त्यांनी प्रेक्षकांना पोट धरून हसायला भाग पाडले.

महेश मांजरेकर यांच्या ‘वास्तव’ चित्रपटातून नांदलस्कर यांचा बॉलिवूडच्या रुपेरी पडद्यावर प्रवेश झाला. ‘जिस देश में गंगा रहता है’, ‘तेरा मेरा साथ है’, ‘खाकी’, ‘ये तेरा घर ये मेरा घर’, ‘हलचल’, ‘सिंघम’, प्राण जाए पर शान न जाए या हिंदी चित्रपटांतील त्यांच्या भूमिका देखील गाजल्या.

ताज्य बातम्यांच्या अपडेट्साठी आमच्या फेसबुक पेज  आणि टि्वटरवर आम्हाला फॉलो करा… 

आमच्या व्हॉटस्अ‍ॅप गृपला जॉईन होण्यासाठी ब्लू लाईनला टच करा

https://chat.whatsapp.com/C2lBmNXGceHGLS7IeE

You May Also Like