आदिनाथ कोठारेनं सुरू केलं युट्यूब चॅनेल, काय काय असणार त्यात?

मुंबई । चंद्रमुखी सिनेमा रिलीज झाला आणि सुपर डुपर हिट ठरला. चंद्राचा राजकारणी प्रियकर दौलतराव देशमानेही तितकाच लोकप्रिय झाला. खूप गॅपनंतर आदिनाथ कोठारेनं मराठी सिनेमा केला. काही वर्षांपूर्वी त्यानं पाणी हा सिनेमा दिग्दर्शित केला आणि त्याला पुरस्कारही मिळाले. आता अजून तो बरंच काही करणार आहे.
हे सगळं प्रेक्षकांपर्यंत, फॅन्सपर्यंत पोहोचवण्यासाठी आदिनाथनं आता स्वत:चं युट्यूब चॅनेल सुरू केलंय. आपल्या चाहत्यांना तो सांगतोय की ‘मी काही नवं सुरू करत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरचं. माझ्या जगतातल्या अनेक घडामोडी मी तुम्हाला इथे सांगेन.’
आमच्याशी बोलताना आदिनाथ कोठारे म्हणाला, ‘मी एका मराठी सिनेमाची निर्मिती करणार आहे. पण अजून बऱ्याच गोष्टी आहेत. ज्या मी काही दिवसांनी सांगेन.’ आदिनाथच्या समोर आता भरपूर वेगवेगळं काम आहे. या आपल्या कामाबद्दलचीच माहिती तो त्याच्या युट्यूब चॅनेलवर देणार आहे.
आदिनाथचं उर्मिलासोबत तुझं आता पटत नाही, अशी चर्चा सुरू होती. यावर आदिनाथ अगोदर जोरात हसलाच. त्यानंतर म्हणाला, ‘अशा बातम्या आम्ही वाचतो आणि त्यावर खूप हसतो. आम्ही दोघंही बिझी आहोत.’ उर्मिलाचीही तुझेच गीत मी गात आहे ही सीरियल सुरू आहे. आदिनाथ पुढे म्हणाला, ‘आम्ही खरंच बिझी असतो. अशा गोष्टींसाठी वेळ नाही. पण जेव्हा या बातम्या पाहतो, तेव्हा खूप हसतो.’
लावणीसम्राज्ञी चंद्रा आणि धुरंदर राजकारणी दौलत देशमाने यांच्या प्रेमाची हळुवार किनार असलेला आणि एका लावणी कलावंताचं आयुष्य मांडणारा चंद्रमुखी हा सिनेमा गेल्या वर्षभरापासूनच चर्चेत होता. कादंबरीकार विश्वास पाटील यांच्या कादंबरीचं सिनेमात रूपांतर करण्यात आलं आहे. अखेर ही विश्वास पाटलांची कादंबरीतील चंद्रमुखी मोठ्या पडद्यावर अवतरली.

You May Also Like