कौतुकास्पद! धुळे तालुका पोलिसांची कामगिरी; वेषांतर करून उत्तर प्रदेशच्या प्रतापपूर जिल्ह्यातून मारेकरीला अटक 

गैरप्रकारास नकार दिल्याने केला खून
धुळे : प्रतिनिधी जळगावच्या दिशेने जाणार्‍या टँकरमधील सुमारे पाच टन गॅसचा काळाबाजार केल्यानंतर चालक मिर्झा अहमद बेग याचा खून करणार्‍याला उत्तर प्रदेशातून अटक झाली. नफीस अहमद असे त्याचे नाव आहे. धुळे तालुका पोलिस पाच दिवस उत्तर प्रदेशात वेषांतर करून त्याचा शोध घेत होते. मालकाशी प्रामाणिक असलेला आझाद बेग याने गैरव्यवहार करण्यास नकार दिल्यामुळे त्याचा खून झाल्याचे समोर आले आहे.

धुळे तालुक्यातील पुरमेपाडा शिवारात मिर्झा अहमद बेग ( वय 30) याचा मृतदेह आढळला होता. त्याचा खून झाल्याचे निष्पन्न झाले होते. या प्रकरणात नफीस अहमद मोहंमद इसा व इम्रान खान उर्फ नौशाद अली यांची नावे समोर आली होती. त्यामुळे धुळे तालुका पोलिस दोघांचा शोध घेत होते. सायबर सेलच्या मदतीने त्यांचे लोकेशन शोधले. यानंतर धुळे तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक हेमंत पाटील यांच्या पथकातील सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत गोरावडे, कर्मचारी प्रवीण पाटील, नितीन दिवसे, अमोल कापसे यांचे पथक उत्तर प्रदेशला गेले. या पथकाने प्रतापपूर जिल्ह्यात दोघांचा ओळख लपून वेषांतर करत शोध घेतला. त्यासाठी पोलिस सुमारे चार ते पाच दिवस उत्तर प्रदेशात तळ ठोकून होते.

सखोल तपास केल्यानंतर पोलिसांनी नफीस अहमद मोहंमद इसा (वय 36) याला अटक केली. याशिवाय गॅसचा काळाबाजार करण्यासाठी मदत करणारे इक्बाल याकुब शेख (वय 45, रा. ख्वाजा गरीब नवाज, नशिराबाद, भुसावळ), इम्तियाज मोहंमद रहमान अब्दुल हमीद (रा. मुंबई-आग्रा महामार्ग, पारोळा चौफुलीजवळ, धुळे) यांना अटक झाली. त्यांची 24 जुलैपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आल्याची माहिती पोलिस प्रशासनाकडून देण्यात आली. पोलिसांनी केलेल्या कामगिरीचे पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपअधीक्षक प्रदीप मैराळे यांनी पथकाचे कौतुक केले.

खून केल्यावर नफीस सासरी प्रतापपूर जिल्ह्यातील उडैयाडीह येथे लपला होता. एक खोली घेऊन तो राहत होता. या खोलीच्या पुढील दरवाजावर त्याने कुलूप लावले होते. तो मागील दरवाजाचा तो वापर करत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.

गॅसचा काळाबाजार
पुरमेपाडा शिवारात दोघांनी आझादचा मृतदेह फेकला. त्यानंतर पाच टन गॅसची काळ्या बाजारात विक्री केली. त्यांना 1 लाख 30 हजार रुपये मिळाले. चाळीसगाव चौफुलीजवळ टँकर सोडून दोघे लक्झरीने इंदूरला आले. त्यानंतर ते स्वतंत्र दिशेने पळाले. गॅस काळाबाजार प्रकरणी मोहाडी पोलिसांत तर मृतदेहाचा गुन्हा धुळे तालुका पोलिसांत दाखल होता. गॅसचा गुन्हाही आता मोहाडी पोलिसात वर्ग झाला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेट्साठी आमच्या व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपला जॉईन व्हा…

https://chat.whatsapp.com/GdbPgC62cnKHS4YUh0x6LE

You May Also Like