मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी देखील आज अजित पवार यांची भेट घेत त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपला निर्णय मागे न घेण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. मात्र, तरिही राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांकडून त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरुच आहेत. तसेच पक्षातील आमदारांच्या भावना काय आहेत याचीही त्यांना कल्पना दिली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, छगन भूजबळ यांनी अजित पवार यांना त्यांच्या निर्णयानंतर राष्ट्रवादीचे ३०-३५ आमदार अस्वस्थ असल्याची माहिती दिली आहे. तसेच राष्ट्रवादीत परत येण्याचे आवाहनही केले आहे. अजित पवार यांच्याशिवाय सरकार स्थापन होऊ शकत नाही, असंही या अस्वस्थ आमदारांचं म्हणणं असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील गुंतागुंत समोर आली आहे. यातून मोठं नुकसान होऊ नये म्हणूनच राष्ट्रवादीकडून अजित पवार यांचं मन वळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न होत आहेत.
दरम्यान, छगन भुजबळ यांनी रविवारी (२४ नोव्हेंबर) रात्री अजित पवारांना फोन करून रविवारी भेटायला येत असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर आज सकाळी भुजबळ अजित पवारांच्या भेटीला गेले होते.