अमरावती दुसऱ्या दिवशीही पेटले, संपूर्ण जिल्ह्यात चार दिवसांची संचार बंदी, इंटरनेट सेवाही बंद

अमरावती । गेल्या दोन दिवसांपासून अमरावतीत सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहरात चार दिवसांसाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच या काळात शहरातील इंटरनेट सेवाही बंद ठेवण्यात येणार आहे. या शिवाय अफवा पसरविणाऱ्यांवर कठोर कारवाईही करण्यात येणार आहे.
त्रिपुरातील घटनेच्या निषेधार्थ काल मुस्लिमांनी जिल्ह्यात मोठा मोर्चा काढला होता. या मोर्चावेळी आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केल्याने पोलिसांनी जमावावर लाठीमार केला होता. त्यामुळे शहरात प्रचंड हिंसाचार झाला होता. त्यानंतर आज भाजपने बंदची हाक दिली होती. आज सकाळी राजकमल चौकात प्रचंड मोठा जमाव जमा झाला आणि त्यांनी प्रचंड तोडफोड करण्यास सुरुवात केली. त्यामुळे परिस्थिती आणखीनच चिघळली होती. सध्या अमरावतीत तणावपूर्ण शांतता आहे. मात्र परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून जिल्ह्यात चार दिवसांसाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
——म्हणून संचारबंदी आदेश लागू
बंदच्या पार्श्वभूमीवर काही तोडफोडीच्या घटना घडल्या. त्यानुसार फौजदारी दंड प्रक्रिया संहितेच्या कलम 144 (1), (2), (3) अन्वये पोलीस आयुक्त कार्यालयाकडून संचारबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. अमरावती शहरात कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी संचारबंदी लागू करण्यात येत आहे असे प्रभारी पोलीस आयुक्त संदीप पाटील यांनी आदेशात नमूद केले आहे.
——काय आहेत आदेश?
संचारबंदी कालावधीत कोणीही व्यक्ती वैद्यकीय कारण वगळता इतर कारणासाठी घराबाहेर पडणार नाही. तसेच पाचपेक्षा जास्त इसम एकत्रित जमणार नाहीत. तसेच कोणत्याही प्रकारच्या अफवा प्रसारित करू नयेत. या आदेशाचा भंग करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने भारतीय दंड संहितेच्या कलम 188 अन्वये शिक्षापात्र अपराध केला आहे असे मानण्यात येईल. तसेच त्यानुसार कारवाई करण्यात येईल. हा आदेश आजपासून संपूर्ण अमरावती शहरासाठी पुढील आदेशापर्यंत लागू राहील असे आदेशात नमूद आहे.
——अमरावतीत तासभर थरार
दरम्यान, आज सलग दुसऱ्या दिवशी अमरावती पेटले. अमरावतीत सकाळपासूनच जमावाकडून जोरदार दगडफेक सुरू आहे. अमरावतीत राजकमल चौकात तोंडाला रुमाल लावून आलेल्या काही आंदोलकांनी हातात विटा घेऊन दुकानांच्या दिशेने फेकल्या. तर काही तरुणांनी दगडांनी दुकाने फोडली. काही तरुणांनी तर थेट रुग्णालयाला लक्ष्य केले. या तरुणांनी रुग्णालयाच्या दिशेने दगडफेक केली. पोलिसांनी या जमावाला पोलिसांनी पांगवण्याचा प्रयत्न केला असता जमावासोबत पोलिसांची बाचबाची झाली. त्यामुळे पोलिसांना लाठीमार करावा लागला. मात्र जमाव प्रचंड असल्याने त्यांना नियंत्रित करणे अशक्य होत होते. शिवाय पोलिसांची कुमकही कमी असल्याने जमावाला पांगवताना पोलिसांची दमछाक होत होती. तब्बल तासभर हा थरार सुरू होता.

You May Also Like