ओमिक्रॉनचे सावट असतानाच करोना रुग्णसंख्येत वाढ; केंद्राचा ६ राज्यांना अलर्ट

नवी दिल्ली । देशातील ओमिक्रॉन बाधित रुग्णांची संख्या तीनवर पोहचली असतानाच काही राज्यांत कोविड बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने चिंतेत भर पडली आहे. ही बाब गांभीर्याने घेत केंद्र सरकारने तातडीने या राज्यांना पत्र पाठवलं असून त्यात महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत.
दक्षिण आफ्रिकेत ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर आतापर्यंत ३८ देशांत ओमिक्रॉनने पाय पसरले असून भारतात आजच ओमिक्रॉनचा तिसरा रुग्ण आढळला आहे. एकीकडे ओमिक्रॉनने टेन्शन वाढवले असतानाच देशातील काही राज्यांत गेल्या काही दिवसांपासून कोविड बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने केंद्र सरकारने त्याची गंभीर दखल घेतली आहे व राज्यांना पत्र लिहून चिंता व्यक्त केली आहे.
केंद्रीय आरोग्य सचिवांनी केरळ, जम्मू-काश्मीर, तामिळनाडू, कर्नाटक, ओडिशा आणि मिझोराम या सहा राज्यांना पत्र लिहिले आहे. राज्यात कोविडचे रुग्ण वाढत असताना ही रुग्णवाढ रोखण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची गरज आहे. टेस्टिंग, ट्रेसिंग आणि ट्रीटमेंट यासोबतच लसीकरण वाढवण्यावर भर देण्यात यावा तसेच कोविड विषयक नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जावी अशी सूचना केंद्राने या राज्यांना केली आहे. केरळमध्ये करोना मृत्यूदर अधिक आहे. त्याबाबत आरोग्य सचिवांनी चिंता व्यक्त केली. जम्मू-काश्मीर, कर्नाटकमध्ये प्रत्येकी चार जिल्ह्यांत रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे तर तामिळनाडूतील तीन जिल्ह्यांतील रुग्णसंख्यावाढ अधिक आहे. ओडिशा आणि मिझोराममध्येही अशीच स्थिती आहे. कोविडचे नवीन रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे तातडीने आवश्यक पावले उचलावी असे निर्देशही केंद्राकडून देण्यात आले आहेत.
दरम्यान, ओमिक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेत केंद्र सरकारने देशातील सर्व आंतरराष्ट्रीय विमानतळांवर प्रवाशांची आरटी-पीसीआर चाचणी सक्तीची केली आहे. ओमिक्रॉनसाठी जागतिक आरोग्य संघटनेने हाय रिस्क देश निश्चित केले आहे. तिथून भारतात येणाऱ्या प्रवाशांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. प्रामुख्याने दिल्ली आणि मुंबई विमानतळावर अधिक दक्षता बळगण्यात येत आहे. त्यातच काही प्रवासी भारतात परतल्यानंतर नॉट रिचेबल आहेत. त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे.

You May Also Like