वृद्धावर एकाने चाकूने वार करून जखमी- मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

मुक्ताईनगर येथील बुऱ्हाणपूर रोडवरील श्री हॉटेल समोर भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या वृद्धावर एकाने चाकूने वार करून जखमी केल्याची घटना काल सकाळी 10 वाजेच्या सुमारास घडली घटने दरम्यान परिसरात एकच खळबळ उडाली होती. याबाबत सविस्तर माहिती अशी की, मुक्ताईनगर येथील प्रवर्तन चौकात बऱ्हाणपूर रोड लगत असलेल्या श्री हॉटेलच्या समोर गोपाळ काठोके यांचे एक छोटेसे दुकान आहे त्या ठिकाणी त्यांची आई शांताबाई काठोके या डबा घेऊन आले असता त्यांच्याशी रमजान खान अयुब खान (रा.गुलाबगंज बऱ्हाणपूर मध्य प्रदेश) , शाहरुख शेख आजम शेख (रा. भुसावळ) , शिवम गोपाल ठाकूर (रा. शिवाजीनगर बऱ्हाणपूर ) तसेच अनिल पहिलवान ( पूर्ण नाव माहीत नाही ) अशा चौघांनी वाद घातला. त्यामुळे शेजारी मोबाईलचे दुकान असलेल्या सागर ओंकार पाटील (वय 32 वर्षे) व त्याचे वडील ओंकार विठोबा पाटील (वय 60 वर्ष) हे समजावण्यासाठी आले असता त्यांना रमजान खान अयुब खान याने तुम्ही आमच्या वादात पडण्याचे कारण नाही. तुम्ही मध्ये बोलले तर तुम्हाला जीवे ठार मारेल असे म्हणत धमकी देऊन खिशातून चाकू बाहेर काढला. त्यानंतर इतर तीन संशयित आरोपींनी सुद्धा मारहाण केली व चाकूने जीवे मारण्याच्या इराद्याने ओंकार विठोबा पाटील यांच्या गळ्यावर व छातीवर चाकूने वार केले. त्यात वृद्ध असलेल्या ओंकार पाटील गंभीर जखमी झाले आहे. या प्रकरणी भा.द.वि.307, 324, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे तर एक जण फरार आहे.

You May Also Like

error: Content is protected !!