अनिल परब देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा निघणार?

मुंबई । ऐन दिवाळीच्या तोंडावर सुरु झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांचा संप अद्यापही सुरुच आहे. गेल्या आठवडाभरापासून शेकडो एसटी कर्मचारी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोतही मुंबईतील आझाद मैदानावर ठाण मांडून आहेत. या पार्श्वभूमीवर आज परिवहन मंत्री अनिल परब यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीवेळी फडणवीस यांनी काही सूचना केल्याचं परब यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
एसटी कर्मचाऱ्यांचा तिढा अद्याप संपलेला नाही. कर्मचाऱ्यांना सकाळी पुन्हा एकदा आवाहन केले आहे. विलिनीकरणाच्या मुद्द्यावर हायकोर्टाने नेमलेली कमिटीच निर्णय घेईल. आम्ही चर्चेसाठी तयार आहोत. फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. त्यांनी राज्याचा कारभार हाकला आहे. त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत काही सूचना केल्या आहेत. फडणवीसांच्या सूचनांवर आम्ही विचार करु, असे अनिल परब म्हणाले. दरम्यान, हिवाळी अधिवेशनाबाबत कोणतीही चर्चा झाली नाही, असेही परब म्हणाले.
—–‘सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनवाढ द्यायला तयार आहोत… पण’
आम्ही एसटी कामगारांना वेतनवाढ द्यायला तयार आहोत. पण केवळ प्रश्न बेसिक वेतनाचा आहे. तो चर्चा करून सोडवला जाईल, असे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले. एसटी कामगारांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच निर्णय घेतील असे अनिल परब यांनी दुपारी सांगितले होते.
—–रोजंदारी कर्मचाऱ्यांना इशारा
रोजंदारी कर्मचाऱ्यांना काल नोटीस दिलीय. आज 24 तासची वेळ संपत आहे. कोण कामावर येत नसतील त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. संपकरी कामावर न आल्यास 2016-2017 आणि 2019 च्या भरती प्रक्रियेतील वेटिंगवाल्यांचा विचार करावा लागेल, असे त्यांनी सांगितले. कायदेशीर प्रक्रिया करूनच कारवाई केली जाईल. लोकांची सहानुभूती गेल्यास मग कर्मचारी अडचणीत येतील. सरकार चर्चेसाठी तयार आहेच. सर्व गोष्टींचा अभ्यास करून समिती अहवाल देईल. त्यातून लगेच मार्ग निघणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
—–फडणवीसांचा ठाकरे सरकारला सवाल
राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. मात्र, अन्य विषय पुढे आणत एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्याचं काम केले जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. फडणवीस यांनी ट्विट करत, ‘विविध विषयांच्या धुराळ्यात एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न आहेत तसेच कायम आहेत. ऊन, वारा आणि आज तर पावसाला तोंड देत 10 दिवसांपासून एसटी कर्मचारी आस लावून आहेत. दिशाभूल, संभ्रम, खोटे आरोप,फसवाफसवी, माध्यम व्यवस्थापन इत्यादी काही काळ बाजूला ठेऊन त्यांच्या समस्यांकडे लक्ष द्याल का?’ असा सवाल फडणवीसांनी केला.

You May Also Like