महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या 23 गावांमधील दैनंदिन सुमारे 200 ते 300 टन कचरा वाढला

पुणे – महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या 23 गावांमधील दैनंदिन सुमारे 200 ते 300 टन कचरा वाढला आहे. हा कचरा महापालिकेकडून उचलण्यास सुरुवात करण्यात आली असली तरी या गावांमध्ये एकही कचरा प्रक्रिया प्रकल्प नसल्याने महापालिकेची चांगलीच कोंडी झाली आहे.

या गावांमध्ये प्रकल्प प्रस्तावित होते का, तसेच कोणत्या खासगी कंपन्या कचरा प्रक्रियेसाठी पुढे आल्या होत्या याची माहिती महापालिकेकडून घेण्यात येत असून प्रकल्पांसाठी जागा राखीव आहेत का, याचा अहवालही जिल्हा परिषदेकडून मागविण्यात आला असल्याचे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमणार यांनी सांगितले.

23 गावांच्या हद्दीत कचरा तयार होत असला तरी हा कचरा गावांकडून नदीकाठच्या परिसरात अथवा महापालिकेच्या हद्दीलगत टाकला जात होता. महापालिकेलाच हा कचरा उचलावा लागत होता. त्यानंतर आता ही गावे पालिकेतच आल्याने पालिकेस हा कचरा उचलणे बंधनकारक झाले आहे.

त्यामुळे महापालिकेने कचरा उचलण्याच्या यंत्रणेसोबतच पालिकेच्या यंत्रणेची सोय उपलब्ध करून देत कचरा उचलण्यास सुरूवात केली आहे. तर ज्या गावांनी कचरा उचलण्यासाठी आउटसोर्सिंगची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यांचे काम पुढील दोन महिने सुरू ठेऊन त्याद्वारे कचरा उचलण्यात येत येणार आहे.

You May Also Like