जिल्हा कोरोना मुक्तीकडे वाटचाल करत असल्याने स्थानिक प्रशासनाने जिल्ह्यात अनलॉक धोरण

संभाजीनगर जिल्हा कोरोना मुक्तीकडे वाटचाल करत असल्याने स्थानिक प्रशासनाने जिल्ह्यात अनलॉक धोरण राबवले आहे. संभाजीनागरातील बाधितांची संख्या कमी होत असल्याने 17 जूनच्या सकाळी 6 वाजल्यापासून जगप्रसिद्ध अजिंठा, वेरूळ लेण्यांसह महत्त्वाची पर्यटन स्थळे पर्यटकांसाठी खुली करण्यात येणार आहेत. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी काढले आहेत. यामुळे गेल्या दीड वर्षापासून शुकशुकाट असलेल्या या पर्यटन स्थळावर आता पर्यटकांची गर्दी फुलणार आहे.

संभाजीनगर जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्र गेल्या गेले दीड वर्षांपासून सुनेसुने झाले होते. यामुळे पर्यटकांची संख्या शून्यावर आली होती. गेल्या महिन्यापासून शहरातील कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने घटत असून जिल्हा आता कोरोना मुक्तीच्या दिशेने चालला आहे. अलिकडेच जिल्हा प्रशासनाने संभाजीनगर जिल्हा आणि ग्रामीण भागातील निर्बंध शिथील केले होते. निर्बंध शिथील केल्यानंतरही बाधितांची संख्या घटत असल्याचे दिसून आले आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाने 17 जून रोजी सकाळी 6 वाजेपासून जिल्ह्यातील अजिंठा वेरूळ, बिबीका मकबरा, दौलताबाद किल्ला ही पर्यटन स्थळे पर्यटकांसाठी खुली करण्याचा निर्णय घेतला आहे. या पर्यटनस्थळांवर सकाळच्या सत्रात 1000 आणि दुपारच्या सत्रात 1000 पर्यटकांनाच प्रवेश दिला जाणार आहे. पर्यटकांना या ठिकाणी भेट देत असताना कोरोनाच्या नियमांचे काटेकोर पालन करावे लागणार आहे. पर्यटन स्थळे खुली करण्यात आली असली तरी धार्मिक स्थळे मात्र तूर्तास बंदच राहणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे.

You May Also Like