उन्हाळ्याची दाहकता वाढत असतांना रानावनातील पशू, पक्षी अन्न-पाण्यासाठी गावाकडे धाव घेत

धरणगाव : उन्हाळ्याची दाहकता वाढत असतांना रानावनातील पशू, पक्षी अन्न-पाण्यासाठी गावाकडे धाव घेत आहेत. असाच एक वाट चुकलेला मोर रविवारी धरणगाव शहरात येवून पोहचला. तर, कुत्र्यांची धडपड मोराची शिकार पकडण्यासाठी चालली होती. शेवटी मोर एका घराच्या आडोश्याला लपला. यावेळी शिवसैनिकांच्या प्रसंगावधानामुळे राष्ट्रीय पक्षी मोर आपला जीव वाचवू शकला.

उन्हाळ्याची दाहकता वाढत असतांना रानावनातील पशू, पक्षी अन्न-पाण्यासाठी गावाकडे धाव घेत आहेत. असाच एक वाट चुकलेला मोर रविवारी धरणगाव शहरात येवून पोहचला. गावात आल्यावर अनोळखी परीसर. सर्वत्र सिमेंटचे जंगल. अश्यात तो मोर बावरला. घाबरघुबरत तो येथील मातोश्री काॅम्पलेक्स परीसरात येवून पोहचला. येथे कायम मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट असतो. त्यांच्या तावडीत तो सापडला आणि सुरु झाला एक प्राणघातक खेळ. मोराचा आकांडतांडव जीव वाचविण्यासाठी. तर, कुत्र्यांची धडपड शिकार पकडण्यासाठी. बराचवेळ हा खेळ चालला. शेवटी मोर एका घराच्या आडोश्याला लपला. तेथे कुत्रे घुसूशकत नव्हते. ही माहिती कुणीतरी नायब तहसिलदार प्रथमेश मोहळ यांना कळविली.

मोहोळ यांनी त्याभागातील कार्यकर्ते व शिवसैनिक विनोद सुरेश रोकडे, नंदू पाटील अरविद चौधरी, गोपाल पाटील, जयेश कसार यांना तेथे पिठविले. त्यांनी वनविभागाचे वनपाल प्रशांत देविदास (राजवड), एन एस क्षीरसागर (वनरक्षक), प्रवीण पाटील (एन जी ओ) यांच्याशी संपर्क साधला. मधल्या काळात त्यांनी मोराला एका सुरक्षित घरात हुसकून लावले व दार बंद करुन ठेवले.

वनाधिकारी आल्यानंतर सर्व शिवसैनिकांनी मोराला त्यांच्या हवाली केले. अधिकाऱ्यांनी सर्वांना सोबत घेवून मोराला राजवडच्या संरक्षित वनात सोडून दिले. मुक्त झालेला मोर आनंदाची गिरकी घेत जणू जीव वाचविणाऱ्यांना धन्यवाद देत जंगलात पसार झाला. शिवसैनिकांच्या प्रसंगावधानामुळे राष्ट्रीय पक्षी मोर आपला जीव वाचवू शकला. याबद्दल त्या सर्वांचे अभिनंदन होत आहे.

You May Also Like