शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्या सिंधूदुर्गातील बंगल्यावर हल्ला

 

सिंधुदुर्ग । केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर अटकेची कारवाई झाल्याने राज्यभरात शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष पेटला आहे. राणे यांची जामिनावर सुटका झाली असली तरी तणाव कायम असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याचे वृत्त आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केंद्रीय मंत्री राणे यांनी जन आशीर्वाद यात्रेदरम्यान सोमवारी आक्षेपार्ह विधान केले. त्यानंतर मंगळवारी राज्यभरात त्याचे पडसाद उमटले. ज्या महाडमध्ये राणे यांनी हे विधान केले होते त्यासह नाशिक, मुंबई, ठाणे व अन्य ठिकाणी राणे यांच्याविरुद्ध शिवसेनेच्या तक्रारीवरून गुन्हे दाखल करण्यात आले. त्याचवेळी राज्यभर राणे यांच्याविरुद्ध उग्र निदर्शने करण्यात आली. राणे मंगळवारी संगमेश्वरमधील गोळवली येथे होते. तिथे जात रत्नागिरी पोलिसांनी राणे यांना दुपारी अटक केली. त्यानंतर रात्री उशिरा महाड येथे कोर्टात राणेंना हजर करण्यात आले व कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केला.

You May Also Like