चक्क पत्रकाराच्या अटकेसाठी बेलारूसनं पाठवलं लढाऊ विमान

मिंस्क : पत्रकारिता लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो. मात्र बेलारूस या देशानं सरकार विरुद्ध लिहिणार्‍या एका पत्रकाराला अटक करण्यासाठी चक्क लढाऊ विमान पाठवल्याची घटना घडल्यानं जगभरात खळबळ उडाली.

बेलारूस सरकारनं रविवारी पत्रकाराला अटक करण्यासाठी लढाऊ विमान पाठवून तो प्रवास करत असलेलं विमान जबरदस्तीनं बेलारूसची राजधानी मिंस्क इथल्या विमानतळावर उतरवलं आणि त्याला ताब्यात घेतलं. मात्र इथल्या माध्यमांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. हा पत्रकार प्रवास करत असलेल्या विमानात बॉम्ब असल्याची खबर मिळाल्यानं लढाऊ विमान पाठवावं लागलं, असं त्यांनी म्हटलं आहे.

रायन एअरचे एक विमान ग्रीसहून लिथुआनियाला जाणार होते. मात्र हे विमान जबरदस्तीनं बेलारूसच्या राजधानीकडे मिंस्कच्या दिशेनं वळवण्यात आलं. यासाठी एमआयजी-29 लढाऊ विमान पाठविण्यात आलं होतं. या प्रकारामुळे 7 तास उशीरा हे विमान लिथुआनियाला पोहोचले. प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, मिंस्कमध्ये हे विमान उतरवण्यात आल्याबद्दल विमान कंपनीनं अतिशय विचित्र कारणं सांगितली. एका प्रवाशाने सांगितलं की, पत्रकार आणि ब्लॉगर रोमन प्रोटसाविक खूप घाबरले होते. प्रोटसाविक यांनी आपल्याला मृत्यूदंड ठोठावण्यात आल्याचं विमानातील प्रवाशांना सांगितलं होतं.

युरोपीय देशांनी व्यक्त केली नाराजी
विमान कंपनीच्या वतीनं अचानक मिंस्क विमानतळावर उतरवण्यात आलेलं विमान आणि उड्डाणाला झालेला विलंब यासाठी सुरक्षिततेचं कारण देण्यात आलं. युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष चार्ल्स मायकेल यांनी सोमवारी या घटनेवर चर्चा करण्यात येईल, असं म्हटलं आहे. ही अपहरणाची घटना असल्याची टीका अनेक युरोपियन नेत्यांनी केली आहे.

You May Also Like