‘आप’ची मोठी घोषणा, पंजाब मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर

मोहाली । पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पार्टीने राज्याच्या मुख्यमंत्री पदाचा आपला उमेदवार आज जाहीर केला आहे. आम आदमी पक्षाचे पंजाबमध्ये सरकार आल्यास भगवंत सिंह मान यांना मुख्यमंत्री केले जाईल, असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जाहीर केले आहे.
—–‘आप’कडून भगवंत सिंह मान हे मुख्यमंत्रीपदी
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार स्थापन होणार आहे. पंजाबचा मुख्यमंत्री निवडण्यासाठी 21 लाख 59 हजार लोकांनी आपला कौल दिला, त्यापैकी 93.3 टक्के लोकांनी भगवंत सिंह मान यांच्या नावावर सहमती दर्शवली.
—–मुख्यमंत्री चेहरा निवडण्यासाठी लोकशाही पद्धतीचा अवलंब : केजरीवाल
अरविंद केजरीवाल म्हणाले की, भगवंत सिंह मान हे माझ्या धाकट्या भावासारखे आहेत. पण मी आधी त्यांचे नाव जाहीर केले असते तर लोकांनी त्यांच्यावर आरोप केले असते. कारण बहुतेक लोक घराणेशाही करतात. मात्र आमच्या पक्षाने मुख्यमंत्री चेहरा निवडण्यासाठी लोकशाही पद्धतीचा अवलंब केला. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या पक्षाने मुख्यमंत्रिपदासाठी जनतेचा कौल घेतला आहे.
—–आम आदमी पक्षाने लोकांकडून मत मागवले होते
आम आदमी पार्टीने यासाठी मोबाईल क्रमांक जारी करुन जनतेचे मत मागवले होते आणि 3 दिवसांत 21 लाखांहून अधिक लोकांनी आपले मत दिले आहे. लोकांनी फोन कॉल्स, व्हॉट्सअॅप आणि मेसेजच्या माध्यमातून आपले मत मांडले.
अरविंद केजरीवाल यांनी आधीच स्पष्ट केले होते की ते पंजाबमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाहीत. तरीही काही लोकांनी सल्लामसलत करताना अरविंद केजरीवाल यांचे नाव घेतले.
विशेष म्हणजे पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचा चेहरा शीख समुदायाचा असेल, असे आम आदमी पक्षाने आधीच स्पष्ट केले होते. 2017 मध्ये मुख्यमंत्रिपदाचा चेहरा नसल्यामुळे ‘आप’ला मोठा झटका बसला असून, बाहेरच्या राज्यातून कोणी येऊन मुख्यमंत्री कसा काय होऊ शकतो, असे विरोधकांनी म्हटले होते.

You May Also Like