आताची मोठी बातमी : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सुरक्षा वाढवली, ठाकरे सरकारचा निर्णय

मुंबई । मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना आलेल्या धमकीच्या पत्राच्या पार्श्वभूमीवर यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज ठाकरे यांच्या सुरक्षेच्या ताफ्यात एक पोलिस अधिकारी आणि एक पोलिस अंमलदार वाढविण्यात आला आहे. भोंगेविरोधी आंदोलनच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी जीवे मारण्याच्या धमकीची पत्रं आली होती. यासंबंधी मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली होती. कालच राज ठाकरेंच्या सुरक्षेविषयी गृहमंत्री वळसे पाटील आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली. आज अखेर राज्य सरकारने राज ठाकरे यांची सुरक्षा वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
—–कसा असणार राज ठाकरेंचा सुरक्षा ताफा?
राज ठाकरे यांच्या सुरक्षेचा दर्जा पूर्वीचाच Y+ असणार आहे.
मात्र त्यांच्या सुरक्षेतील ताफ्यात पोलिसांची वाढ करण्यात आली आहे.
सुरक्षा ताफ्यात एक पोलिस अधिकारी आणि एक पोलिस अंमलदार वाढविण्यात आला आहे.
—–राज ठाकरेंना धमकी, मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांमध्ये चर्चा
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी काल (शुक्रवारी) संध्याकाळी ७ वाजताच्या सुमारास वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत प्रामुख्याने राज ठाकरे यांना आलेल्या धमकीबाबत चर्चा झाली. याअगोदर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली होती. या भेटीत नांदगावकर आणि गृहमंत्री वळसे पाटलांमध्ये दीर्घ चर्चा झाली. यानंतर काल वळसे पाटलांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन राज ठाकरे यांच्या सुरक्षेविषयीची माहिती मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातली.
—–बाळा नांदगावकरांनी घेतली होती गृहमंत्र्यांची भेट
राज ठाकरे यांना आलेल्या धमकीच्या पत्राच्या पार्श्वभूमीवर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली होती. राज ठाकरे यांना जीवे मारण्याच्या धमकीचं पत्र आलं असल्याचं बाळा नांदगावकरांनी गृहमंत्र्यांना सांगितलं. राज ठाकरेंना धमकीचं पत्र माझ्याजवळ आल्याची माहिती बाळा नांदगावकर यांनी यावेळी गृहमंत्र्यांना दिली. या धमक्यांबाबत माहिती देण्यासाठीच नांदगावकर यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली. हे पत्र कोणी लिहलं, कुठून आलं याबाबत सध्या काहीही माहिती नाही असे नांदगावकरांनी सांगितलं होतं. माझं ठिक आहे, पण राज ठाकरेंच्या केसालाही धक्का लागला तर संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठेल असा इशाराही त्यांनी त्यावेळी दिली होती.

You May Also Like