मोठी बातमी! सैन्य भरतीचा ‘तो‘ पेपर फोडणारा लेफ्टनंट कर्नलच…

पुणे : भारतीय सैन्य दलातील वेगवेगळ्या पदासाठी भरती प्रक्रिया राबविणार्या सिकंदराबाद येथील भरती प्रक्रिया प्रमुख अधिकार्यानेच सैन्य भरती पेपर फोडला असून या रॅकेटचा तोच मुख्य सुत्रधार असल्याचे पुणे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे.

सैन्य दलातील कर्मचार्यांच्या नातेवाईकांसाठी आर्मी शिपाई पदासाठी भरती प्रक्रियेतील लेखी परिक्षा 28 फेब्रुवारी रोजी भारतभरातील 40 केंद्रांवर होणार होती. या परिक्षेच्या प्रश्न पत्रिका फोडून काही व्यक्ती ती प्रश्नपत्रिका व्हॉटसअपवरुन वेगवेगळ्या खासगी सैनिक भरती प्रशिक्षण केंद्र प्रमुखांना भरघोस रक्कमेला विकणार असल्याची गोपनीय माहिती सर्दन कंमाड मिलिटरी इंटेलिजन्सच्या लायझन युनिटला मिळाली होती. ही गोपनीय माहिती त्यांनी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना कळविली. त्यानंतर पुणे पोलिसांच्या दोन वेगवेगळ्या पथकाने वानवडी आणि विश्रांतवाडी परिसरात सापळा रचून कारवाई करून किशोर गिरी (रा. माळेगाव), माधव गित्ते (रा. सॅपर्स विहार कॉलनी, विश्रांतवाडी), गोपाळ कोळी (रा. बीईजी सेंटर, दिघी), उदय औटी (रा. बीईजी सेंटर, खडकी) यांना अटक केली होती. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांना हा पेपर तामिळनाडु येथील आर्मी अधिकारी थिरु मुरगन याने दिल्याचे निष्पन्न झाले. त्याला अटक केली. हा पेपर त्याला दिल्लीतील अधिकारी वसंत किलारी याच्याकडून आल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याला अटक केली.

त्यानंतर सिकंदराबाद येथील भरती प्रक्रिया प्रमुख अधिकारी भगतप्रितसिंग बेदी यानेच पेपर लिक केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक भालेराव, हवालदार अतुल साठे व राजपूत यांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन बेदी याला दिल्लीहून ताब्यात घेऊन अटक केली. नारनेपाटील वीरप्रसाद याला पोलीस उपनिरीक्षक चव्हाण, सहायक फौजदार वांजळे, पोलीस नाईक केकाण यांनी अटक केली आहे.

You May Also Like