नाना पटोलेंच्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर भाजप आक्रमक, राज्यभरात आंदोलने

मुंबई । काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यानं वादंग निर्माण झाला आहे. याविरोधात भाजप चांगलीच आक्रमक झालीय. नाना पटोलेंवर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी नागपुरात आंदोलन करण्यात आलं. भाजप नेते आमदार चंद्रशेखर बावनकुळेंच्या नेतृत्वाखाली कोराडी पोलीस स्टेशन परिसरात ठिय्या आंदोलन केलं. यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.
—–राज्यात ठिकठिकाणी आंदोलने
तर भाजप युवा मोर्चानं नालासोपारा पूर्व इथं काँग्रेस विरोधात आंदोलन केलं. यावेळी नाना पटोलेंचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध व्यक्त केला. नाना पटोलेंवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. जालना जिल्हा भाजपच्या वतीनं शहरातील गांधी चमन चौकात आंदोलन करून निषेध करण्यात आला.
—–नाना पटोलेंवर गुन्हा दाखल करा – फडणवीस
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी केली आहे. केवळ शारिरीक उंची असून चालत नाही, तर वैचारिक-बौद्धीक उंची पण असावी लागते, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. पंजाबमध्ये पंतप्रधान मोदी यांचा ताफा 20 मिनिटं खोळंबून रहातो, काँग्रेसचे मुख्यमंत्री त्याची साधी दखलसुद्धा घेत नाहीत.
आता महाराष्ट्राचे काँग्रेस अध्यश्र म्हणतात मी मोदींना मारू शकतो, काँग्रेस पक्षात चाललंय तरी काय? असा सवाल फडणवीस यांनी विचारला आहे. कधीकाळा स्वातंत्र्याच्या आंदोलनात असणारा हा पक्ष इतक्या रसातळला गेला आहे, सत्तेसाठी काहीही, काँग्रेसला आता राजकीय पक्ष म्हणायचं की दहशत पसरवणारी संघटना? अशा शब्दात फडणवीस यांनी फटकारलं आहे.
—–पुण्यात पटोलेंविरोधात फ्लेक्स
पुण्यात नाना पटोले यांना खुलं आव्हान देणारे फ्लेक्स लावण्यात आले आहेत. भाजप नगरसेवक धीरज घाटे यांनी हे फ्लेक्स लावले असून ‘नाना, पुण्यात कधी येताय, स्वागताला उत्सुक आहोत’ असं या फ्लेक्समध्ये लिहिण्यात आलं आहे.
—–नाना पटोले यांना खुले आव्हान
तर नाना पटोले, ‘त्या’ गुंडाची छायाचित्रासह माहिती प्रसिद्ध करा, असं खुलं आव्हान भाजपाने दिलं आहे. ‘मी पंतप्रधानांबद्दल बोललो नाही, माझ्या मतदारसंघातल्या गुंडाबद्दल बोललो’ हा नाना पटोले यांचा खुलासा धादांत खोटारडेपणा आहे’ असा आरोप महाराष्ट्र भाजपाचे उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी केला आहे.‘नाना पटोलेनी ह्या गावगुंडाचे छायाचित्र आणि संपूर्ण माहिती प्रसिद्ध करावी असे आव्हानही भांडारी ह्यांनी दिलं आहे.

You May Also Like