भाजप नगरसेविकेच्या पतीचा गोंधळ; रूग्णालयात घुसविली कार

कन्नू ताजणे अद्दापही फरार..

नाशिक रोड : महापालिकेच्या नाशिकरोड येथील बिटको कोविड रुग्णालयात नगरसेविका सीमा ताजणे यांचे पती राजेंद्र ताजणे यांनी शनिवारी रात्री आठच्या सुमारास बिटकोचे प्रवेशव्दार फोडून कार आत घुसवत रुग्णालयाचे नुकसान केले. नंतर कर्मचा-यांना मारहाण व शिवीगाळ केली. महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी आज रुग्णालयाला भेट देऊन कर्मचारी, डॉक्टर, तसेच रुग्णांची विचारपूस करत त्यांचे मनोधैर्य वाढवले. त्याचबरोबर ताजणे यांच्याविरुध्द जास्तीत जास्त कठोर कारवाई व शिक्षा कशी होईल याबाबत पोलिस आयुक्तांकडे पाठपुरावा करत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी बिटकोचे नोडल अधिकारी डॉ. जितेंद्र धनेश्वर, विभागीय अधिकारी संजय गोसावी, बांधकाम अभियंता संजय घुगे, कार्यकारी अभियंता धर्माधिकारी, उपअभियंता निलेश साळी, डोंगरे आदी उपस्थित होते. आयुक्तांनी आज दुपारी बाराच्या सुमारास रुग्णालयात येऊन नुकसानीची माहिती घेतली. विविध विभागांना भेटी देऊन अधिकारी, कर्मचा-यांशी चर्चा केली. त्यांच्याशी व रुग्णांशी चर्चा करत मनोबल वाढवले. धीर सोडू नका, प्रशासन तुमच्या पाठीशी भक्कमपणे आहे. रुग्णांची सेवा सुरुच ठेवा असा संदेश दिला. आयुक्तांनी कालच्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज, कारने नुकसान झाली ती जागा पाहिली. एमआरआय मशीनची पाहणी केली. तोडफोड प्रकरणाची सविस्तर महिती डॉ. जितेंद्र धनेशवर यांच्याकडून घेतली.

आयुक्त म्हणाले की, कालची घटना ही अत्यंत दुर्दैवी व निंदनीय आहे. काही घटना अनपेक्षित असतात. पोलिस, सुरक्षा असूनही त्या घडतात. त्यामुळे कोणाला दोष देण्यात अर्थ नाही. पुन्हा अशा घटना घडू नये साठी ताजणेंसारख्या प्रवृत्तींविरुध्द जास्तीत जास्त कठोर कारवाई करण्यात येईल. पोलिसांनी ताजणेंविरुध्द विविध कलमे लावली आहेत.

प्रशासनाच्या कामात बाह्य व्यक्तींचा हस्तक्षेप वाढला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये हे प्रकार घडत आहेत. रुग्णाचे नातेवाईक, मित्र करोना रुग्णालयात बिनदक्तपणे प्रवेश करत आहेत. करोनाच्या मागील लाटेत एक व्यक्ती बाधीत होत असे. आता कुटुंबच्या कुटुंबे बाधीत होत आहेत. याचे गांभीर्य नागरिकांनी लक्षात घेऊन पुरेशी खबरदारी घेणे गरजेचे आहे. तिसरी लाट येणार आहे. त्याबाबत आतापासूनच लोकांचे प्रबोधन करणे आवश्यक आहे. बिटकोत रेमेडेसिवर इंजेक्शनच्या टंचाई असल्यामुळेच ताजणे यांच्याकडून संतापाच्या भरात कार घुसविण्याचा प्रकार घडला का असे विचारले असता आयुक्त जाधव म्हणाले की, रेमेडिसिवरचा पुरेसा साठा आहे. सर्वात जास्त रेमडिसिवर बिटको आणि जाकीर हुसेन रुग्णालयाला देण्यात आले आहेत. तरी नातेवाईक या इंजेक्शनचा आग्रह धरतात. रेमडिसिवरची रुग्णाला गरज आहे की नाही हे फिजीशयन नाही तर नातेवाईक ठरवत आहे. ते चुकीचे आहे. फिजिशीयनला ते ठरवू द्यावे. बिटकोत दोन फिजीशियन आणि 77 वॉर्डबॉय नियुक्त करण्यात आल्याने मनुष्यबळाचा प्रश्न ब-यापैकी सुटला आहे. कर्मचारी नियुक्त करुन, त्यांना जादा पगार देऊनही ते सेवेत दाखल होत नाहीत. दाखल झाले तर काही दिवसात नोकरी सोडतात. बिटकोत डॉक्टरवरील ताण कमी करण्यासाठी स्वतंत्र प्रशासकीय अधिका-याची गरज नाही. दोन इंजिनियर, अधीक्षक हे काम करत आहेत. बिटकोतील समस्या सोडविण्यासाठी मी सातत्याने लक्ष देत आहे. कामावर किती जण हजर -गैरहजर राहतात याची माहिती रोज घेत आहे. महापालिकेची रुग्णालये आपलीच रुग्णालाय आहेत अशी भावना लोकांनी ठेवली तर अनेक प्रश्न सुटतील.

You May Also Like