शिवसेनेच्या वर्धापन दिनानमित्ताने केलेल्या भाषणावर भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी टीका केली

जळगाव : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या वर्धापन दिनानमित्ताने केलेल्या भाषणावर भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी टीका केली होती. त्याला शिवसेना नेते ना. गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख हे शिवसेनेचे गँग प्रमुखच आहेत. गँग प्रमुखाने नुसता आदेश दिला तरी काय होते, हे सर्वांना माहीतच आहे. त्यामुळे गँग प्रमुखांच्या नादाला लागू नका, असा टोला ना. गुलाबराव पाटील यांनी सुधीर मुनगंटीवार यांना लगावला.

ना. पाटील पुढे बोलताना म्हणाले, ‘सुधीर मुनगंटीवारांसारख्या नेत्याने अशा प्रकारचे वक्तव्य करणे हास्यास्पद आहे. शिवसेना प्रमुखांचे पुत्र गँगप्रमुख आहेतच. ते आम्ही मान्य करतो. ते शिवसेनेचे गँगप्रमुख आहेत. तुमच्या गँगप्रमुखांची काय कामे चालू आहेत? हे आम्हाला चांगले माहिती आहे. त्यामुळे कृपा करून शिवसेनेच्या नादी लागू नये’, असे ना. गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

ते एका गँग प्रमुखाचं भाषण होतं – सुधीर मुनगंटीवार

आम्ही गुंड आहोत अशी भाषा करायची आणि काँग्रेसने स्वबळावर लढण्याची भाषा केल्यावर त्यांना जोड्यानं हाणायची भाषा करायची, हे आश्चर्यकारक आहे. आपल्या भाषणात त्यांनी हिंदुत्व काय हे सांगितलं. ते लोकांना माहीतही आहे. पण हिंदुत्वाबद्दलची तुमची भूमिका काय आहे हे तरी सांगा? उद्धव ठाकरे यांचं संपूर्ण भाषण सत्तेच्या खुर्चीच्या आसपास घुटमळणारं होतं. आपल्या भूमिकेंच उदात्तीकरण करणारं होतं. मला वाटतं हे सरकारच्या प्रमुखाचं भाषण नव्हतंच, ते एका गँग प्रमुखाचं भाषण होतं, अशी खोचक टीका मुनगंटीवार यांनी ट्विट करून केली होती.

You May Also Like