इंडियन प्रीमिअर लीगच्या १४ व्या पर्वाचे उर्वरित ३१ सामने खेळवण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ

इंडियन प्रीमिअर लीगच्या १४ व्या पर्वाचे उर्वरित ३१ सामने खेळवण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ( BCCI) सर्व प्रयत्न करताना दिसत आहे. हे ३१ सामने न झाल्यास बीसीसीआयला २५०० कोटींच्या नुकसानाला सामोरे जावं लागू शकतं. म्हणूनच इंग्लंड किंवा संयुक्त अरब अमिराती ( UAE) येथे आयपीएल २०२१च्या दुसऱ्या टप्प्याच्या आयोजनाचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. त्यातील UAE वर जवळपास शिक्कामोर्तब झाले असून सप्टेंबर-ऑक्टोबरची विंडो निश्चित झाली आहे आणि २९ मे रोजी होणाऱ्या विशेष सर्वसाधारण सभेत याबाबतची घोषणा होणार असल्याचे वृत्त टाईम्स ऑफ इंडियानं दिले आहे. बीसीसीआयच्या या नव्या तारखांनी टीम इंडियाच्या खेळाडूंची दमछाक होणार हे निश्चित आहे.

भारतीय संघ २ जूनला इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. तेथे १८ ते २३ जून या कालावधीत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये ( WTC Final 2021) त्यांना न्यूझीलंडचा सामना करावा लागणार आहे. त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेला ४ ऑगस्टपासून सुरूवात होणार आहे. बीसीसीआयनं ही मालिका जुलै महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापासून सुरू करावी असा प्रस्ताव इंग्लंड व वेल्स क्रिकेट मंडळाकडे (ECB) ठेवणार असल्याची चर्चा आहे. त्यात आता नवा प्रस्ताव समोर येत आहे. दुसऱ्या व तिसऱ्या कसोटीत ९ दिवसांचा कालावधी आहे आणि तो कमी करून तिसरी व पुढील दोन कसोटी सामने आधी खेळवण्याचा प्रस्ताव बीसीसीआयनं तयार केला आहे. जेणेकरून बीसीसीआयला आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यासाठी पाच अतिरिक्त दिवस मिळतील. याबाबत बीसीसीआयनं ECB कडे चर्चा केलेली नाही, परंतु पाच कसोटींसाठीच्या ४१ दिवसांच्या विंडोत बदल केल्यास आयपीएलच्या उर्वरित सामन्यांचा मार्ग मोकळा होऊ शकतो.

बीसीसीआयनं ECB कडे विनंती केल्यास आयपीएलसाठी ३० दिवसांची विंडो तयार होऊ शकते आणि आयपीएलचे उर्वरित सामने १५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीत खेळवले जाऊ शकतात. ”भारत-इंग्लंड कसोटी मालिकेतील त्या अतिरिक्त दिवसांचे नियोजन केल्यास आयपीएलसाठी विंडो तयार होऊ शकते. आयपीएलसाठी ३० दिवस मिळू शकतात. मग भारत व इंग्लंडच्या खेळाडूंना थेट लंडनहून यूएईत आणता येईल. २४ दिवसांत साखळी सामने खेळवले जातील. यात चार आठवडे आम्हाला मिळतात, याचा अर्थ शनिवार व रविवार डबलहेडर सामने होतील,”असे सूत्रांनी TOI शी बोलताना सांगितले.

बीसीसीआय ECB कडे अतिरिक्त पाच दिवसांचा प्रस्ताव ठेवणार आहे. जेणेकरून ट्वेंटी-२० वर्ल्ड कपसाठी खेळाडूंना पुरेशी विश्रांती मिळू शकते. १८ ऑक्टोबरपासून ट्वेंटी-२० वर्ल्ड कप होणे अपेक्षित आहे. आयसीसीही वर्ल्ड कप स्पर्धेच्या आयोजनासाठी यूएईचाच विचार करत आहे आणि आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यामुळे खेळाडूंचा त्यासाठी चांगला सराव होऊन जाईल, असा दावा सूत्रांनी केला आहे. पण, या सर्वात खेळाडूंची दमछाक होणे हे निश्चित आहे.

You May Also Like