‘करोना’मुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची माहिती सादर करावी!

जिल्हाधिकारी संजय यादव यांचे आरोग्य यंत्रणेला निर्देश
धुळे : करोना विषाणूमुळे अनेक बालकांनी दोन्ही पालक गमावले आहेत. अशा बालकांची काळजी व संरक्षण करीत त्यांचे न्याय हक्क मिळवून देत त्यांच्या संगोपनासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यामुळे धुळे जिल्ह्यातून कोरोना विषाणूमुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची माहिती आरोग्य यंत्रणेने तातडीने उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात आज दुपारी ‘कोविड-19’ दरम्यान दोन्ही पालक गमावलेल्या बालकांच्या काळजीसाठी गठित जिल्हास्तरीय कृती दलाची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माणिक सांगळे, जिल्हा प्रशासन अधिकारी पल्लवी शिरसाट, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी हेमंतराव भदाणे, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी श्री. चव्हाण, बालविकास अधिकारी एम. एम. बागूल, निरीक्षण गृहाच्या अधीक्षक अर्चना पाटील, जिल्हा बालकल्याण समितीचे अध्यक्ष ङ अमित दुसाने आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. यादव म्हणाले, मा. सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली येथील न्यायाधीशांच्या बाल समितीच्या निर्देशानुसार ‘कोविड 19’ प्रादुर्भावाच्या काळात बालकांची काळजी व संरक्षणाचे काम करणार्‍या संस्थांमधील बालकांना तसेच ‘कोविड 19’ मुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देत त्यांच्या संगोपानासाठी उपाययोजना व्हाव्यात म्हणून कृती दल गठित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व रुग्णालयात चाइल्ड हेल्पलाइन 1098 या क्रमांकाचा फलक सर्व रुग्णालयांच्या दर्शनी भागात प्रदर्शित करावा. महानगरपालिका क्षेत्रात कार्यरत बालगृहे, निरीक्षण गृहातील मुलांसाठी तत्काळ स्वतंत्र वैद्यकीय पथक गठित करावे. या आजाराने दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना पोलिस दलाने सर्वतोपरी संरक्षण उपलब्ध करून द्यावे. अशी बालके शोषणास बळी पडणार नाहीत किंवा बालकामगार, तस्करीसारख्या गुन्हेगारीत सापडणार नाहीत याचीही दक्षता पोलिस दलाने घ्यावयाची आहे, असेही जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी सांगितले. ‘कोविड 19’ या आजाराने दोन्ही पालक गमावलेल्या बालकांस बाल संगोपन योजनेंतर्गत लाभ देत बालकाचा ताबा नातेवाईकांकडे देण्याच्या शक्यतेबाबत पडताळणी जिल्हा बालकल्याण समितीने करावी. तसेच कृती दलाची बैठक दर पंधरा दिवसांनी आयोजित करावी, अशाही सूचना देत जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी बालगृहांचा आढावा घेतला. जिल्हा महिला व बालविकास
अधिकारी श्री. भदाणे यांनी ‘कोविड 19’ मुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांसाठी सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. दोन्ही पालक गमावलेली बालकांना काही समस्या असल्यास त्यांनी चाइल्ड हेल्पलाइन क्रमांक 1098, 83089-92222 (सकाळी 8 ते रात्री 8), 7400015518 (सकाळी 8 ते रात्री 8) येथे किंवा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, धुळे, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी, 52, जयहिंद कॉलनी, सुधा हॉस्पिटलसमोर, देवपूर, धुळे (दूरध्वनी : 02562- 224729), अध्यक्ष, सदस्य, बालकल्याण समिती, धुळे, मुलांचे निरीक्षणगृह, बालगृह, साक्री रोड, धुळे येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

You May Also Like