भाई का बर्थ डे… अन् वाजले की बारा

पिंपरी : वाढदिवसानिमित्त फेसबुकवर टाकलेली एक पोस्ट गुन्हेगाराला महागात पडली. या पोस्टमुळे गुंडा विरोधी पथकाने त्याला अटक केल्याने त्याला आपला वाढदिवस पोलीस कोठडीत काढावा लागला. अजय विलास काळभोर (वय 27, रा. आडवाणी कंपनीच्या मागे, चिंचवड), अनिल प्रशांत सोनावणे (वय 24, रा. विद्यानगर, चिंचवड) आणि सोमनाथ राजू देवाडे (वय 21, रा. गणेशनगर, चिंचवड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांची सोशल मीडियावर विशेषतः गुन्हेगारी वृत्तीच्या सराईतांवर नजर असल्याने या दोन्ही पोस्टबाबतची माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे आणि गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांना मिळाली. त्यांनी सराईत गुन्हेगार आणि त्याला शुभेच्छा देणार्‍या प्रशांत सोनावणे यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त प्रशांत अमृतकर यांना दिले. अमृतकर यांच्या सूचनांनुसार गुंडा विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक हरीश माने यांनी या दोन्ही गुंडांच्या मुसक्या आवळल्या.

अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे यांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी अजय काळभोर याचा वाढदिवस असल्याने सकाळी अकरा वाजताच्या सुमारास त्याने ’कुछ दिन और सही, बहोत बडा धमाका होगा, पूरे पिंपरी चिंचवड मे अपनाही नाम होगा’, अशा आशयची पोस्ट त्याने फेसबुकवर टाकली. तसेच त्याचा साथीदार प्रशांत सोनावणे यानेही त्याला शुभेच्छा देताना ’भाऊ आमचा, बाप तुमचा’ पोस्ट टाकली. तर आरोपी देवाडे हा अजय काळभोर याचे फेसबुक अकाऊंट हाताळत होता. तीनही आरोपींना पोलिसांनी अटक केलीयं.

You May Also Like