परतू शकतात ‘तारक मेहता’, जेठालालचे सूतोवाच

मुंबई । छोट्या पडद्यावरील ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ कार्यक्रम खूप लोकप्रिय आहे हे तर साऱ्यांनाच माहीत आहे. कार्यक्रमात सातत्यानं नवनवीन ट्विस्ट आणि वळणं येत आहेत. त्यामुळे कार्यक्रमाची सातत्यानं चर्चा होत आहे. काही दिवसांपूर्वी शैलेश लोढा यांनी कार्यक्रमातून बाहेर पडत असल्याचं जाहीर केल्यानं प्रेक्षकांना मोठा धक्का बसला आहे.

कार्यक्रमाचे निर्माते असीतकुमार मोदी तसेच मालिकेतील सहकलाकार शैलेश यांनी कार्यक्रमात परत यावेत यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. परंतु शैलेश कुणाचेच फोन घेत नसल्यानं त्यांना कार्यक्रमात परतण्याची इच्छा नसल्याच्या चर्चांना सुरुवात झाली. याबाबत ना शैलेश यांनी खुलासा केला ना निर्मात्यांनी. परंतु आता कार्यक्रमातील जेठालाल अर्थात दिलीप जोशी यांनी याबाबत वक्तव्य केलं आहे. तसंच त्याचा मित्र शैलेश याच्या कार्यक्रमात परतण्याबाबतही सूतोवाच केलं आहे.

दिलीप जोशी यांनी मीडियाशी संवाद साधला तेव्हा त्यांनी शैलेश यांनी कार्यक्रमातून बाहेर पडण्याच्या निर्णयावर ही भाष्य केलं आहे. दिलीप यावेळी म्हणाले की, ‘बदल गरजेचा असतो. काही अडचण असती तर त्यानं कधीच कार्यक्रम सोडला असता. तुमच्या सहकलाकारांबरोबर ट्युनिक जुळलेलं असतं. ते शैलेश यांच्याबरोबर आमचं सगळ्यांचं जुळलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की शैलेशभाई कार्यक्रमात परत येतील.’ अर्थात यात किती तथ्य आहे हे माहिती नाही.

तारक मेहता का उल्टा चश्मा कार्यक्रमात गेल्या १४ वर्षांपासून दिलीप जोशी जेठालाला ही भूमिका करत आहेत. मालिका अव्याहतपणं सुरू असल्याबद्दल दिलीप जोशी म्हणाले की, ‘याबद्दल मी फक्त इतकंच सांगीन की देवाची आम्हा सर्वांवर कृपा आहे. खास करून असितभाईंवर. काही वर्षांपूर्वी त्यांनी तारक मेहता सारखा कार्यक्रमाची घोषणा केली.

ते कार्यक्रमावर गेल्या ४० वर्षांपासून काम करत होते आणि त्यानंतर कार्यक्रम तयार करण्याचा निर्णय घेतला. त्यात आम्हा सर्वांना काम करण्याची संधी मिळाली. देवाची कृपा आहे आणि आम्हा सर्वांना प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं. इतक्या वर्षांनंतरही प्रेक्षक आवडीनं कार्यक्रम बघत आहेत. १४ वर्षे कार्यक्रम प्रसारित होत आहे, हा एक विक्रमच आहे. हे सर्व देवाच्या कृपा असल्यानेच झाले आहे.’

जेठालाल असतात सोशल मीडियापासून दूर

जेठालाल अर्थात दिलीप यांना ते सोशल मीडियापासून दूर का आहेत, असा प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितलं की, ‘मी सोशल मीडियावर फारसा सक्रीय नाही. कारण त्यासाठी माझ्याकडे वेळ नाही. रोज आम्ही १२ तास चित्रीकरण करतो आणि जेव्हा ते संपतं तेव्हा घरी जातो. कुटुंबाबरोबर मी वेळ घालवतो. सोशल मीडिया एक राक्षस आहे. त्याची सवय जर तुम्हाला लागली तर ती कधीच सुटत नाही. त्यामुळेच यापासून दूर राहण्याचं मी ठरवलं आहे.’

 

You May Also Like