केंद्र सरकारकडून दरदिवशी फक्त 26 हजारच रेमडेसिवीरचा पुरवठा!

मुंबई : करोनाच्या दुसऱ्या लाटेत संपूर्ण देशात हाहाकार माजला आहे. देशभरात प्रतिदिन तीन लाखांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद करण्यात येत आहे. तसेच ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन यांचा तुटवडा जाणवत आहे

दरम्यान, केंद्र सरकारने राज्य सरकारला दर दिवसाला 40 हजार रेमडेसीवीर इंजेक्शन देण्याचे मान्य केले आहे. पण, प्रत्यक्षात 26 हजारच दिले जात असल्याची माहिती अन्न औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिली. राज्यात रेमडेसीवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत असल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्र व्यवहार करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी केली होती. पंतप्रधान मोदींनीही ही मागणी मान्य करत पुरवठा वाढवला होता.

पण, ‘केंद्र सरकारने राज्याला 21 एप्रिल ते 30 एप्रिल दर दिवशी 40 हजार रेमडेसीवीर इंजेक्शन दर दिवशी देण्याची घोषणा केली असली तरी प्रत्यक्षात फक्त 26  हजार रेमडेसीवीर इंजेक्शन उपलब्ध होत आहेत. कंपन्या किती इंजेक्शनचा साठा करत आहे. याविषयीच पत्र केंद्र सरकारला देत आहोत’, अशी माहिती अन्न औषध प्रशासन मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी दिली.

‘तसेच, राज्य सरकार पूर्वी कंपन्यांकडून थेट प्रतिदिवस 40 हजारांपेक्षा जास्त रेमडीसीवीर इंजेक्शन खरेदी करत होतो. आता हे अधिकार थेट केंद्र सरकारने घेतले आहेत. केंद्र सरकार सांगेल तेवढाच पुरवठा आता कंपन्या करीत आहे’, अशी माहितीही शिंगणे यांनी दिली.

‘केंद्र सरकारने 21 एप्रिल ते 30 एप्रिलपर्यंत दीड लाख इंजेक्शन देऊ केले आहे. राज्य सरकारने वाढवून दिल्याची मागणी केली. पण केंद्र सरकारने आता 4.5 लाख रेमडेसीवीर देणार सांगितलं. दर दिवशी 40 हजार इंजेक्शन मिळणं अपेक्षित होत पण प्रत्यक्षात 26 हजार मिळत आहेत.  कंपन्यांनी उत्पादन कमी असल्याचं सांगितलं’, असंही शिंगणे यांनी सांगितले. दरम्यान, आम्ही केंद्र सरकारकडे ही सर्व बाब पत्राने कळवत आहोत, लवकरात लवकर पुरवठा सुरळीत करावा, अशी विनंती शिंगणे यांनी केली.

You May Also Like