मुंबईसह मध्य महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता

मुंबई:  मागील तीन दिवसांत सोलापूर, कोल्हापूर, उस्मानाबाद आणि सातारा जिल्ह्याला अवकाळी पावसानं झोडपलं आहे. पुण्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मोठ्या प्रमाणात गारपीटही झाली आहे.असं असलं तरी अद्याप राज्यावरील अवकाळी पावसाचं संकट दूर झालं नाही. पुढील आणखी पाच दिवस राज्यात अवकाळी पावसाचं संकट कायम असणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.

सध्या पश्चिम विदर्भ ते दक्षिण तामिळनाडू आणि कर्नाटक या भागात कमी दाबाचा पट्टा सक्रीय झाला आहे. शिवाय दक्षिण महाराष्ट्रात चक्रीय वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे. परिणामी राज्यात अनेक ठिकाणी पूर्व मोसमी पाऊस पडत आहे. सध्या गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक आणि दक्षिणेकडील इतर प्रदेशात अवकाळी पावसाचे ढग दाटले आहेत. त्यामुळे याठिकाणी पुढील पाच दिवसांत वादळी वाऱ्यसह आणि मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

तसेच, पुढील काही दिवस मध्य महाराष्ट्राला पूर्व मोसमी पावसाचा तडाखा बसू शकतो. याठिकाणी विजांच्या गडगडासह सोसाट्याच्या वाऱ्याच्या साथीनं जोरदार पावसाची शक्यता आहे. शिवाय मध्य महाराष्ट्रात एक ते दोन ठिकाणी गारपीटही होऊ शकते, अशा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.

त्याचबरोबर, साप्ताहाच्या शेवटी मुंबईतही अवकाळी पाऊस धडकू शकतो. येथे तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे.

आमच्या व्हॉटस्अ‍ॅप गृपला जॉईन होण्यासाठी ब्लू लाईनला टच करा

https://chat.whatsapp.com/C2lBmNXGceHGLS7IeE

You May Also Like