इंग्लंडच्या संघात मोठा बदल; डेविड मलानचं संघात पुनरागमन

नवी दिल्ली । कसोटी मालिकेत भारताने १-० ने आघाडी घेतली आहे. आतापर्यंत झालेल्या दोन सामन्यात पहिला सामना पावसामुळे अनिर्णित ठरला. तर दुसरा सामना भारताने १५१ धावांनी जिंकला. भारताच्या विजयानंतर इंग्लंडने तिसऱ्या कसोटीसाठी संघात काही बदल केले आहेत. तिसरा कसोटी सामना २५ ऑगस्टपासून हेडिंग्ले (लीड्स) येथे खेळला जाणार आहे. इंग्लंडने संघातून जॅक क्रॉले, डॉम सिबली, जॅक लीच यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. दुसरीकडे टी २० मध्ये जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या डेविड मलानचं कसोटीत पुनरागमन झालं आहे. या व्यतिरिक्त वेगवान गोलंदाज साकिब महमूदला संघात स्थान मिळालं आहे. तर साकिबला तिसऱ्या कसोटी संघात संधी मिळण्याची शक्यता आहे.

 

 

डेविड मलानने ऑगस्ट २०१८ मध्ये शेवटचा कसोटी सामना खेळला होता. त्याने आतापर्यंत खेळलेल्या १५ कसोटी सामन्यात त्याने २७.८ च्या सरासरीने ७२४ धावा केल्या आहेत. त्यात एका शतकाचा समावेश आहे. दुसरीकडे साकिबने आतापर्यंत एकही कसोटी सामना खेळलेला नाही. पाकिस्तानविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत त्याने ९ गडी बाद केले होते. ही मालिका इंग्लंडने ३-०ने जिंकली होती.

You May Also Like