धुळ्यात केमिस्ट्स अ‍ॅन्ड ड्रगिस्ट असोसिएशनकडुन बंदचा इशारा !

धुळे : करोनाकाळात औषध विक्रेत्यांना 24 तास सेवा देत आरोग्यव्यवस्थेला मोठा हातभार लावलायं. तरीही केंद्र व राज्य शासनाकडून व्यावसायिकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने मागण्यांची दखल न घेतल्यास पुढील काळात व्यवसाय बंदचा इशारा द महाराष्ट्र स्टेट केमिस्ट्स अ‍ॅन्ड ड्रगिस्ट असोसिएशनकडुन देण्यात आला आहे.

प्रसिद्धीस पत्रकात सांगितले कि, राज्यभरात कोविडच्या प्रादुर्भावाची पहिली लाट ओसरून दुसर्‍या लाटेचा सामना करतो आहोत. कोविडच्या महामारीत कोविडयोद्धा म्हणून औषध विक्रेत्यांच्या सेवेकडे सरकारने पूर्णत: दुर्लक्ष केले. औषध विक्रेता व तेथील कर्मचारी आपल्या जिवावर उदार होऊन चोवीस तास सेवा देत आहेत. त्यामुळे देशभरासह राज्यात औषध पुरवठा सुरळीत राहण्यास मदत झाली. विक्रेत्यांचा प्रत्यक्ष संबंध कोविड रुग्ण किंवा त्यांच्या संपर्कातील नातेवाइकांशी येतो व त्यांना दुष्परिणामास सामोरे जावे लागतेय. देशभरात दोनशेहून अधिक औषध विक्रेते कोविडचे बळी ठरले असून, हजाराहून अधिक परिवारांतील त्यांचे नातेवाईक बाधित झाले आहेत. असे असताना केंद्र व राज्य सरकारने कोविडयोद्धा म्हणून सन्मान तर दूरच साधे लसीकरणात प्राधान्य देण्याचे औदार्य दाखविले नाही. संघटनेने वेळोवेळी केलेल्या पत्रव्यवहाराची दखल शासनाने घेतली नाही. सरकारची भूमिका अशीच राहिल्यास सभासदांचा वाढता दबाव लक्षात घेता संघटनेला संपूर्ण लॉकडाउनमध्ये सहभागी होऊन व्यवसाय बंद करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. शासनाने गंभीर दखल न घेतल्यास नाइलाजास्तव व्यवसाय बंदची भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा अखिल भारतीय व महाराष्ट्र राज्य संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी दिला आहे.

याबाबत धुळे जिल्हाधिकारी व धुळे महापालिका आयुक्त तसेच अन्न व औषध प्रशासनाच्या सहाय्यक आयुक्तांना निवेदन देण्यात आलयं. या वेळी धुळे जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष नरेश भगत, जिल्हा सचिव अमित पवार, जिल्हा सहसचिव अनिल चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष शांतिलाल पाटील, माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र गिंदोडिया, संघटक सचिव जगदीश महाले, धुळे तालुकाध्यक्ष विजय चौधरी, शिंदखेडा तालुकाध्यक्ष जितेंद्र गिरासे आदी उपस्थित होते.

You May Also Like