कोंबड्यांना न मारताच मिळणार आता चिकन; सिंगापुर ठरला जगातील पहिला देश

नवी दिल्ली : प्रयोगशाळेत अजून जिवंत प्राण्यांची निर्मिती करणं माणसाला जमलेलं नाही. मात्र, प्रयोगशाळेत मांसाची निर्मिती करणं, ते वाढवणं इथपर्यंत मानवाने मजल मारली आहे. त्यासाठी सर्वात आधी एका जिवंत प्राण्याच्या शरीरातल्या स्टेम सेल्स अर्थात मूळ पेशी घेतल्या जातात. त्यांना प्रयोगशाळेत अशा अनुकूल परिस्थितीत ठेवलं जातं, की त्या पेशींची नैसर्गिक स्वरूपात वाढ होऊ लागते. त्यातूनच मसल फायबर्स तयार होतात. एक बर्गर तयार करण्यासाठी कमीत कमी 20 हजार मसल फायबर्सची आवश्यकता असते. मसल फायबर्स विकसित होण्यासाठी अनेक आठवड्यांचा कालावधी लागतो. मांसाहार करणार्‍यांसाठी चिकन म्हणजे एक मेजवानी असते. मात्र, आता चिकन कोंबडी कापल्याशिवायच मिळायला लागलंय, असं सांगितलं तर विश्वास बसेल का? नाही ना! पण हे खरं आहे. सिंगापूरमध्ये कोंबड्यांना न मारता प्रयोगशाळेत तयार केलेलं चिकन विकलं जाऊ लागलं आहे. अशा चिकनच्या विक्रीची परवानगी दिलेला सिंगापूर हा जगातला पहिला देश ठरला आहे.

मागील काही वर्षांपासुन यावर संशोधन सुरू असलं, तरीही किंमत खूप जास्त असल्यामुळे या संशोधनाचा अद्याप सामान्य नागरिकांना फायदा झालेला नाही. हे संशोधन प्रयोगशाळेपुरतंच मर्यादित राहिलं आहे. तरीही आता सिंगापूरने प्रयोगशाळेत तयार केलेल्या मांसाच्या विक्रीला परवानगी दिल्यामुळे या दिशेने आशेचा एक किरण जागृत झाला आहे.

You May Also Like