मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भूमिका कायम सामंजस्याची व संयमाची असते : संजय राऊत

चोपडा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भूमिका कायम सामंजस्याची व संयमाची असते. राज्याच्या विकासाला गती देण्यासाठी ते केंद्रापुढे विनम्रतेने झुकायला तयार असतात. मराठा आरक्षणाचा, मुंबईतील मेट्रो कारशेड आणि पीक विम्याचा प्रश्न हे केंद्रातले विषय आहेत. हे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी पंतप्रधानांची भेट घेतली असेल तर यात नरमणे कुठे आले, अशा शब्दांत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलंय.

राऊत हे सध्या उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. आज दुपारी ४ वाजता ते नंदुरबार येथून जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथे दाखल झाले. यावेळी रावेर लोकसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेतली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. संजय राऊत पुढे म्हणाले, मी तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनाही पंतप्रधानांची दिल्लीत जाऊन भेट घेऊन हा संघर्ष थांबवायला सांगितले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भूमिका कायम सामंजस्याची व संयमाची असते. राज्याच्या विकासाला गती देण्यासाठी ते केंद्रापुढे विनम्रतेने झुकायला तयार असतात. मराठा आरक्षणाचा, मुंबईतील मेट्रो कारशेड आणि पीक विम्याचा प्रश्न हे केंद्रातले विषय आहेत. हे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी पंतप्रधानांची भेट घेतली असेल तर यात नरमणे कुठे आले.

राज्यात सत्ता असली तरी संघटनेला बळ देणे, गावातला शिवसैनिक काय करत आहे, हे प्रत्यक्ष जाऊन पाहणे, हे आमच्यासारख्या नेत्यांचे कर्तव्य आहे. म्हणून मी उद्धव ठाकरेंच्या सूचनेनुसार हा दौरा करत आहे. जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघात संघटनेचे काम उत्तम प्रकारे सुरू आहे. शिवसैनिकांच्या अडचणी जाणून घेणे, त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी हा दौरा आहे, असे राऊत म्हणाले.

एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले आहेत. ते आता महाविकास आघाडीचे घटक आहेत. त्यांची ताकद जर आघाडीला मिळणार असेल आणि शिवसेनेसह इतर पक्ष राज्यात मजबूत होणार असतील तर त्यांचे स्वागतच आहे, असे सांगत राऊत म्हणाले, राज्यपालांना जळगावला बोलावून १२ सदस्यांच्या नियुक्तीविषयी विचारा. तुमच्या जिल्ह्यातील प्रमुख नेत्याचे त्या यादीत नाव आहे. त्यामुळे, त्यांना हा प्रश्न विचारा, असा चिमटा राऊत यांनी काढला.

You May Also Like