मुख्यमंत्री – फडणवीसांची बंद दाराआड चर्चा : भेटीमुळे तर्कवितर्कांना एकच उधाण

मुंबई । केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर राज्यात एकीकडे शिवसेना विरुद्ध भाजप असं चित्र दिसत आहे. तर दुसरीकडे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात 15 मिनिटे बंद दाराआड चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. ही चर्चा नारायण राणेंबाबत झाल्याचंही बोललं जात आहे. अशावेळी खुद्द देवेंद्र फडणवीस यांनीच माहिती दिली आहे. ही बैठक ओबीसी आरक्षणाबाबत होती आणि ओबीसी आरक्षणासंदर्भातच चर्चा झाल्याचं फडणवीसांनी सांगितलं. त्यामुळे मुख्यमंत्री आणि फडणवीस यांच्यात नारायण राणे यांच्याबाबत चर्चा झाल्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे.

 

ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर आज सह्याद्री अतिथीगृहावर सर्व पक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या सर्व पक्षीय बैठकीनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात बंद दाराआड 10 मिनिटं चर्चा झाली. या बैठकीत राजकीय विषयावर चर्चा झाल्याचं सांगण्यात येतं. त्यानंतर फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या 15 मिनिटं चर्चा झाली. दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. विशेष म्हणजे राणेंच्या अटक नाट्याला दोन दिवस होत नाही तोच फडणवीस-ठाकरेंमध्ये चर्चा झाल्याने तर्कवितर्क लढवले जात आहेत. आधी फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि मुख्यमंत्र्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. त्यानंतर फडणवीस आणि मुख्यमंत्र्यांमध्येच चर्चा झाली. या भेटीतील तपशील गुलदस्तात आहे.

You May Also Like