“मुख्यमंत्री फक्त म्हणतात ऑडिट करू, पण…!”

मुंबई :  विरार पश्चिम येथील विजय वल्लभ रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाला मध्यरात्री उशीरा आग लागल्याची घटना घडली. रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावर हा अतिदक्षता विभाग होता. आग लागली तेव्हा अतिदक्षता विभागात १७ रुग्ण होते. यापैकी १३ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

यावर राज्याचे विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “विरार येथील कोविड हॉस्पिटलमध्ये लागलेली आग आणि त्यात झालेले दुर्दैवी मृत्यू ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. एकीकडे कोविडचं प्रचंड भय लोकांच्या मनात आहे. त्यात हॉस्पिटलमध्ये होणाऱ्या घटनांनी अधिक भर पडते आहे”, असं फडणवीस म्हणाले आहेत. पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

पुढे,   “प्रत्येक घटनेनंतर मुख्यमंत्री आणि प्रशासन आम्ही याची चौकशी करू असं सांगतात. आणि दरवेळी सांगितलं जातं की हॉस्पिटलचं फायर ऑडिट करू, पण असं ऑडिट होताना कुठेच दिसत नाही. कोविड काळात हॉस्पिटल्सवर मोठा ताण आहे. अशा परिस्थितीत काहीतरी व्यवस्था उभी केली पाहिजे. अशा प्रकारच्या घटना होणार नाहीत, यासाठीचे चेक्स हॉस्पिटल्समध्ये कसे करता येतील हे पाहिलं पाहिजे. गरज असेल, तर सरकारने हॉस्पिटल्सला मदत केली पाहिजे. भंडारा, इशान्य मुंबई, नाशिक, विरार या सगळ्या घटना अतिशय भयानक आहेत. मृत्यूमुखी पडले त्यांच्या परिवारासोबत आमच्या संवेदना आहेत. तिथल्या रुग्णांची योग्य ती काळजी घेण्याची व्यवस्था सरकारने करावी आणि या घटनांच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करावा. पुन्हा अशा घटना होणार नाहीत, याकरता काही प्रभावी पावलं सरकारच्या वतीने उचलली गेली पाहिजेत अशी माझी सरकारला विनंती आहे”, असं फडणवीस म्हणाले आहेत.

तसेच, सरकारने अशा घटनांचा गांभीर्याने विचार करायला हवा, अशी प्रतिक्रिया यावेळी फडणवीसांनी दिली आहे. “या घटनांचा सरकारने गांभीर्याने विचार करायला हवा. भंडारा, नागपूर, नाशिक, विरार या प्रत्येक घटनेनंतर आपण प्रतिक्रिया देतो. पण अशा घटना होऊ नयेत, याकरता हवं तेवढं लक्ष आपलं नाही. अशा घटनांमुळे कोविडविरोधातली लढाई अजून अडचणीची होते. सरकारच्या सर्व विभागांनी एक कार्यक्रम हातात घेऊन पुढच्या महिन्याभरात राज्यातल्या सर्व हॉस्पिटल्सचं सेफ्टी ऑडिट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे”, असं फडणवीस म्हणाले.

आमच्या व्हॉटस्अ‍ॅप गृपला जॉईन होण्यासाठी ब्लू लाईनला टच करा

https://chat.whatsapp.com/C2lBmNXGceHGLS7IeE

 

You May Also Like