आ. फारुक शाह यांनी फुकटचे श्रेय लाटू नये!

स्थायीच्या सभेत नगरसेवक शितल नवले यांचा घणाघात
धुळे : जयहिंद सिनिअर महाविद्यालय ते जयहिंद जलतरण तलाव पर्यंत रस्त्याच्या कामासाठी मनपा स्थायी सभेत विषय मंजूर करून कामाला सुरूवात करण्यात आली. यासाठी प्रभाग 4 व 5 मधील नगरसेवकांनी सातत्याने तो प्रश्न लावूनही धरला. यात आ.फारूक शाह यांचा काहिही संबंध नाही. रस्त्याच्या कामाचे फुकटचेे श्रेय आ.शाह यांनी लाटू नये असा घणाघात स्थायी समिती प्रसंगी नगरसेवक शितल नवले यांनी केला.

भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी सभागृहात घेण्यात आलेल्या स्थायी समितीच्या सभे प्रसंगी सभापती संजय जाधव समवेत उपायुक्त गणेश गिरी, नगरसचिव मनोज वाघ उपस्थित होते. स्थायी समिती प्रसंगी मोकाट कुत्र्यांचा प्रश्नामुळे पुन्हा गदारोळ माजला. शहरात प्रत्येक प्रभागात मोकाट कुत्र्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. एवढेच नव्हे तर मनपाच्या आवारातही मोकाट कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. मनपात महापौर, स्थायी समिती सभापती आणि इतर विभागांच्या कार्यालयांसमोर ठिय्या मांडल्याने भितीचे वातावरण पसरले आहे. कुत्र्यांचा ताबडतोब बंदोबस्त करण्यात यावा. भटक्या कुत्र्यांचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावावा अशी मागणी स्थायी समितीच्या सभेत नगरसेवक शितल नवले यांच्यासह समाजवादी पार्टीचे अमीन पटेल यांनी केली. यावेळी नगरसेवक अमीन पटेल यांनी देखील शहरासह हिरे वैद्यकीय महाविद्यालय रूग्णालय परिसरातही कुत्र्यांची संख्या वाढली असल्याचे सभेत सांगितले. कुत्र्यांवर नियंत्रण मिळविण्याबाबत रूग्णालयाच्या अधिष्ठातांशी संपर्क साधला परंतू कुत्र्यांवर नियंत्रण आणण्याची जबाबदारी मनपाची असल्याचे अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे सांगून मोकळ्या झाल्या. यावर सभापती जाधव व उपायुक्त गिरी यांनी जिल्हा पशुवैद्यकीय अधिकार्‍यांना पत्र लिहिण्याचे निर्देश आरोग्य विभागाला दिले. महत्वाचे म्हणजे मनपातही पशुवैद्यकीय पद भरण्याबाबत जाहिरात काढण्यात आली होती. परंतू एकही अर्ज आला नसल्याचे आस्थापना विभागाचे रमजान अन्सारी यांनी सांगितले.

मनपातील स्वच्छतागृहा जवळून जात असतांना प्रचंड दुर्गंधी येते, मनपातच अस्वच्छता आहे तर शहरातील इतर स्वच्छतागृहांबाबत न बोललेले बरं असा नाराजीचा सूर नगरसेविका भारती माळी यांनी काढला. प्रभाग क्र 2 मध्ये ज्येष्ठांसह युवकांनाही मेडिटेशन सेंटर उभारण्यात यावे अशी मागणीही माळी यांनी यावेळी केली.

You May Also Like

error: Content is protected !!