धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील उपसा सिंचन योजनांची कामे पूर्ण करा

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या सुचना
साक्री : धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील अनेक वर्षांपासून अपूर्ण अवस्थेतील 22 सहकारी उपसा सिंचन योजनांची प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी दि.20 मे रोजी मंत्रालय मुंबई येथे ऑनलाईन बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत सदरील योजनांची पूर्ण झालेली कामे, अपूर्ण कामे, अडचणी व त्यावरील तातडीने करावयाची अंमलबजावणी बाबतची माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी घेतली.
22 सहकारी उपसा सिंचन योजनांपैकी धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील 8 सहकारी उपसा सिंचन योजना कमलताई – विरदेल, विंद्यासिनी – धमाने, आशापुरी तापीमाई – पाटण, जयभवानी – निमगुल, रविकण्या – लोहगाव, भाग्यलक्ष्मी – लंघाने, दाऊळ मंदाने – दाऊळ, अक्कडसे – नेवाडे यांच्यापैकी 4 उपसा सिंचन योजनांची चाचणी पूर्ण करण्यात आली असून या 8 ही योजना पूर्ण झाल्यानंतर त्याचा फायदा शिंदखेडा तालुक्यातील 22 गावांमधील 3157 शेतकरी बांधवांना होणार आहे. तर 5223 हेक्टर लाभक्षेत्र (म्हणजेच 13,057 एकर) सिंचनाखली येणार आहे.

शिंदखेडा तालुक्यातील 22 गावांचे शेतकरी गेल्या 12-13 वर्षांपासून आपल्या हक्काचे 33.80 दलघमी पाणी सिंचनासाठी उपलब्ध असतांना फक्त सिंचन योजना कार्यान्वित नसल्याने त्यांच्या हक्कांपासून वंचित आहेत. ही बाब राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष संदीप बेडसे यांनी मंत्री जयंत पाटील यांच्या लक्षात आणून दिली. प्रामुख्याने शिंदखेडा तालुक्यातील 8 उपसा सिंचन योजनांचा प्राधान्यक्रम ठरवून प्राधान्याने पूर्ण करण्याबाबतच्या सूचना बैठकीस उपस्थित असणार्‍या अधिकार्‍यांना दिल्या.
सदरील बैठकीसाठी माजी जिल्हाध्यक्ष संदीप बेडसे, जलसंपदा विभागाचे मंत्रालयातील प्रमुख अधिकारी, तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक, अधीक्षक अभियंता धुळे पाटबंधारे प्रकल्प मंडळ धुळे खांडेकर, कार्यकारी अभियंता नंदुरबार चिनावलकर, अभियंता यांत्रिकी नितीन खडसे उपस्थित होते.

You May Also Like

error: Content is protected !!