काँग्रेसकडून प्रकाश आंबेडकरांना राज्यसभेची ऑफर?

मुंबई । वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांना काँग्रेसने राज्यसभेची ऑफर दिल्याचं वृत्त आज दिवसभर विविध प्रसारमाध्यमांना प्रसारित केलं. मात्र या वृत्तात कोणतेही तथ्य नसल्याचं सांगत या केवळ अफवा आहेत, असं स्पष्टीकरण वंचित बहुजन आघाडीने दिलं आहे. निवडणुका जवळ आल्या की काँग्रेसमधील एक गट माध्यमातील काही लोकांना हाताशी धरून खोट्या बातम्या पेरण्याचे काम करीत असतो. अशा खोट्या बातम्या पेरून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा काहीजण प्रयत्न करत असल्याची टीका वंचितने केली आहे.
राज्यात सध्या राज्यसभा निवडणुकांच्या अनुषंगाने चर्चा झडत आहेत. विविध नेते मंडळींच्या भेटीगाठी होत आहेत. महाराष्ट्रातून ६ जागा असल्याने कोणत्या पक्षाकडून कोण उमेदवार असणार, याच्या चर्चा झडत आहेत. काँग्रेसकडून कोण उमेदवार असणार, याची सर्वाधिक चर्चा होतीये. अशातच प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच के पाटील यांची भेट घेतली होती. त्यामुळे आंबेडकर काँग्रेसकडून राज्यसभेवर जाणार, अशा चर्चांना उत आला होता. मात्र या केवळ चर्चाच असल्याचं वंचितने स्पष्ट केलं आहे.
“वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांना काँग्रेसकडून राज्यसभेची उमेदवारी मिळणार असल्याची बातमी माध्यमांमधून प्रसारित करण्यात आली आहे. या बातमीमध्ये काहीही तथ्य नाही. काँग्रेसकडून आम्हाला असा कोणताही प्रस्ताव अद्याप प्राप्त झालेला नाही”, असं वंचितचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी सांगितले.

“निवडणुका जवळ आल्या की काँग्रेसमधील एक गट माध्यमातील काही लोकांना हाताशी धरून खोट्या बातम्या पेरण्याचे काम करीत असतो. अशा खोट्या बातम्या पेरून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा व वंचित बहुजन आघाडीची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे”, असा आरोप सिद्धार्थ मोकळे यांनी केला.

You May Also Like