काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचं मुख्यमंत्र्यांना आवाहन; वेळ आली तर कर्ज घ्या, पण नुकसानग्रस्तांना मदत करा

रत्नागिरी : रत्नागिरीतील तौत्के चक्रीवादळामुळे  झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणीसाठी नाना पटोले सध्या कोकण दौऱ्यावर आहेत.  नुकसानीचा आढावा केल्यानंतर पटोले यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. “कोकणात फार मोठं नुकसान झालं आहे आणि नुकसानग्रस्तांना आपण पुन्हा उभं केलं पाहिजे. केंद्र सरकारने महाराष्ट्राला मदत केली नाही तरी राज्य सरकारने  पुढे येऊन कोकणवासियांना ठोस मदत करावी. कर्ज घ्यावं लागलं तरी चालेल पण लोकांची मदत होणं गरजेचं आहे”, असं आवाहन पटोले यांनी यावेळी केलं.

तौत्के चक्रीवादळानं केलेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सध्या कोकणच्या दौऱ्यावर आहेत. नुकसानग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर त्यांनी गरज पडल्यास कर्ज घ्या, पण नुकसानग्रस्तांची मदत करा, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केलं आहे. तसेच यावेळी त्यांनी भाजपवरही जोरदार टीका केली.  भाजपने गलिच्छ राजकारण सुरू केले आहे. खरंतर ही राजकारण करण्याची वेळ नाही. अडीअडचणीत लोकांना मदत कशी करता येईल याकडे लक्ष द्यायला हवे. नैसर्गिक आपत्तीमध्ये केंद्राकडून मदत मिळालीच पाहिजे हा राज्याचा संवैधानिक अधिकार आहे. केंद्र सरकारच्या तिजोरीत राज्याचा तब्बल चाळीस टक्के हिस्सा जातो हे लक्षात ठेवा, असं नाना पटोले  म्हणाले.

You May Also Like