काँग्रेसच्या र्‍हासाला काँग्रेसवासीच जबाबदार

संतोष ताडे : स्वातंत्र्याकाळापासून काँग्रेसने आपली पाळमुळं घट्ट करून एक दोन नव्हे तर तब्बल पाच तपाहून अधिककाळ या देशावर अधिराज्य गाजविले. घराणेशाहीला आदर्श मानून एकाच घरातील अध्यक्ष काँग्रेससाठी ‘पात्र’ असल्याचे काँग्रेसमधीलच काहींनी गृहीत धरले आहे. काहीही असले तरी काँग्रेसचे समर्पण हा देश विसरू शकत नाही. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल यांनी देशासाठी आणि काँग्रेससाठी काय केलं ? हे कुणालाही सांगण्याची गरज नाही. किबहुना हे सर्वश्रृत आहे. काँग्रसचे आराध्य असलेेल्या पं.जवाहरलाल नेहरूंची दि.27 मे रोजी पुण्यतिथी होती. या पुण्यतिथीच्या दिवशी आपल्याच आदर्श नेत्याला विसरण्याची कृतघ्नता वेगवेगळ्या स्तरावर नेतृत्व सांभाळणारे काँग्रेसमधील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दाखविली, हे खेदाने नमूद करावं लागतय ! म्हणूनच तर काँग्रेसच्या र्‍हासाला काँग्रेसवासीच जबाबदार असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही.

पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केवळ काँग्रेस पक्षासाठीच नव्हे तर संपूर्ण देशासाठी किती खस्ता खाल्ल्या ? स्वातंत्र्यासाठीचा त्यांचा त्याग हे काँगे्रसमधल्या कोणत्याही लहान मोठ्या कार्यकर्त्यांला सांगण्याची गरज नसावी. ज्यांचे फोटो प्रत्येक शासकीय कार्यालयात, शाळा, महाविद्यालयांमध्ये मोठ्या दिमाखात आजही झळकत आहे, हा आता पर्यंतचा केवळ देखावा म्हणावा लागेल. कारण निमित्त करोनाचे असले तरी मर्यादित संख्येत पं. जवाहरलाल नेहरूंना अभिवादन करता आले असते. शासकीय कार्यालये तर सोडाच शाळा, महाविद्यालयांमध्ये हजेरी न लावता गलेलठ्ठ पगार उकळणार्‍यांनीही पंडित जवाहरलाल नेहरू यांना अभिवादन करण्याचे धारिष्टय दाखविले नाही. शाळा, महाविद्यालये बंद आहेत म्हणून ठिक आहे, पण कुठे गेला तो ‘बाल दिन’ ? पंडितजींना लहान मुले आवडायची म्हणून त्यांचा जन्मदिवस ‘बाल दिन’ म्हणून साजरा करण्याची पध्दत सुरू झाली. एकूणच काय की, काँग्रेसला संपविण्याची ताकद कोणातही नाही, फक्त काँग्रेसवासीयांमध्येच आहे हे सिध्द होतं. अर्थात ‘घरका भेदी..’ हा मुहावरा या ठिकाणी तंतोतंत लागू पडतो.

धुळे शहरात काँगे्रस भवन भग्नावस्थेच्या दिशेने वाटचाल करत असतांना अचानक परिवर्तन होऊन एका दिवसासाठी रंगरंगोटी लख्ख करण्यात आले. काँग्रेस पक्षातील धुळ्यातील कार्यकारिणीवर आजही काहीजण वेटोळे घालून बसलेले आहेत. इतरांना संधी न दिल्यास काँग्रेस वाढेल कशी ? पक्षाची ध्येय, धोरणे आणि उद्देशाचा विसर काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पडला आहे असेच म्हणावे लागेल, आणि ते सत्य आहे. कारण पक्षाबाबतची निष्ठा, पक्षासाठी बलिदान देणार्‍यांविषयीची आस्था, पदाधिकारी व कार्यकर्त्यांविषयीचा सन्मान शिल्लकच राहिलेला नाही. काँगे्रसमधील पक्षांतर्गत कलह, घोटाळे आणि भ्रष्टाचारात आकंठ बुडाल्याने भाजपाने संधी साधली आणि काँग्रेसला पाय उतार केले, हे वेगळं सांगायची गरज नाही.

धुळे शहरातील साक्री रोड वर पंडित जवाहरलाल नेहरू यांचा अर्धाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्यानेही सालाबादाप्रमाणे आपल्याला माल्यार्पण केले जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली असेल. या अपेक्षांवरही पाणी फिरविण्याचे काम काँग्रेसमधीलच नेेत्यांनी केले आहे. ज्यांच्या विचारांवर, आदर्शांवर काँग्रेस आजही खंबीरपणे उभी आहे, त्यांचा विसर पडावा. याला काय म्हणाल ? राज्यात महा विकासआघाडी सरकार आहे. पद भोगणार्‍या एकाही काँगे्रसच्या नेत्याने पंडितजींना पुण्यतिथी निमित्त अभिवादन करून दोन पुष्प अर्पण करू नये ? असो. आपल्या आदर्शांबाबत कृतज्ञता यानंतर बाळगली जाईल ही अपेक्षा.

 

You May Also Like