जगात पसरलेला करोना हळूहळू नियंत्रणात येत आहे

नवी दिल्ली : जगात पसरलेला करोना हळूहळू नियंत्रणात येत आहे. तर इथे देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेचा हाहाकार काही प्रमाणात कमी होताना दिसत आहे. करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी सध्या लसीकरण मोहीम वेगाने करण्यात येत आहे. यासाठीच अमेरिकेने एक महत्वाची घोषणा केली. अमेरिकेकडून जगभरातील देशांना 5.5 कोटी करोनाच्या लसी देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

अमेरिकेने केलेल्या या घोषणेचा जगातील अनेक देशांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, अमेरिकेने घोषित केलेल्या लसीच्या वाटपाचा सर्वाधिक हिस्सा 1.6 कोटी लसी या भारत आणि बांग्लादेशसारख्या आशियाई देशांना मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या आधी अमेरिकेकडून अडीच कोटी लसींची मदत करण्याची घोषणा करण्यात आली होती.

आता त्यात 5.5 कोटी लसींची भर पडली असून ती एकूण आठ कोटींवर गेली आहे. अमेरिकेतील कोरोनाच्या लसीकरणाने एक महत्वाचा टप्पा गाठल्यानंतर अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी ही घोषणा केली आहे. अमेरिकेसोबतच जगभरातील कोरोना संपवण्याच्या उद्देशाने आपण या लसी इतर देशांना उपलब्ध करुन देत असल्याचं बायडेन प्रशासनानं सांगितलं आहे.

व्हाईट हाऊसने याबाबत एक निवेदन प्रसिद्ध केलं आहे. त्यामध्ये सांगितलं आहे की, जगभरातील कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी अध्यक्ष बायडेन यांनी इतर देशांना लसी उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेत निर्मिती होणाऱ्या एकूण आठ कोटी लसींचे वितरण जगभरातील देशांना जूनच्या शेवटच्या अठवड्यापर्यंत करण्यात येणार आहे.

अमेरिकेकडून देण्यात येणाऱ्या या आठ कोटी लसींपैकी 75 टक्के लसी या कोवॅक्स कार्यक्रमाच्या अंतर्गत वितरित केल्या जाणार आहेत. उरलेल्या 25 टक्के लसी या ज्या देशात कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात आहे त्या देशांना देण्यात येणार आहेत. त्यामध्ये भारत, बांग्लादेश आणि इतर आशियाई देशांचा समावेश होतो.

You May Also Like