लंडन । जागतिक आरोग्य संघटनेननं ब्रिटनमध्ये मंकीपॉक्स विषाणूचे रुग्ण वाढतील, असा इशारा दिला आहे. सिन्हुआ वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार ब्रिटीश आरोग्य अधिकारी या विषाणूचा अभ्यास करत आहेत. ब्रिटनमध्ये मंकीपॉक्सचे ९ रुग्ण आढळून आले आहेत. प्राथमिक माहितीनुसार मंकीपॉक्सचे रुग्ण स्थानिक पातळीवर आढळले आहेत.
जागतिक आरोग्य संघटनेनं मंकीपॉक्स विषाणू प्रसार कोणत्या पातळीवर झालाय हे सांगता येणार नसल्याचं म्हटलं आहे. मात्र, आगामी काळात त्या बद्दल अंदाज लावता येईल, असं जागतिक आरोग्य संघटनेतर्फे सांगण्यात आलं आहे. ६ मे रोजी एकाच घरातील ३ जणांना याचा संसर्ग झाला होता. गेल्या काही दिवसांमध्ये आणखी चार रुग्ण आढळले आहेत. लंडनमध्ये एक आणि इंग्लंडच्या दक्षिण पूर्व भागात मंकीपॉक्सचा एका रुग्ण आढळला आहे. यूके आरोग्य सुरक्षा यंत्रणेच्या वतीनं इंग्लंडमध्ये ६ मेपासून ९ रुग्ण आढळल्याचं सांगितलं आहे.
—–मंकीपॉक्स कुणाला होतो?
मंकीपॉक्सचा संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये समलैंगिक संबंध असलेल्या व्यक्तींचा समावेश असल्याची माहिती आहे. यूकेएचएसएचे मुख्य आरोग्य सल्लागार सुसान हॉपकिन्स यांनी यासंबधी माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करत असल्याचं म्हटलं आहे. मंकीपॉक्सच्या विषाणूचा अभ्यास करत असल्याचंही त्यांनी सांगितलं. मंकीपॉक्सच्या स्थानिक संसर्गाची भीती असल्यानं आरोग्य अधिकाऱ्यांची चिंता वाढली आहे. मंकीपॉक्स ज्या व्यक्तींमध्ये आढळला त्या व्यक्तींनी परदेश यात्रा केली नव्हती.
जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण १९७० मध्ये आढळला होता. तेव्हापासून आफ्रिका खंडातील ११ देशांमध्ये याचे रुग्ण आढळून आले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार मंकीपॉक्सची लक्षण ६ ते १३ दिवसांमध्ये दिसू लागतात. यामध्ये ताप, डोकेदुखी, पाठ दुखी, मांसपेशीमध्ये वेदना यासह गंभीर आजाराची शक्यता असते. संक्रमित व्यक्तीच्या शरिरावर मोठ मोठ्या फोड्या येतात.
दरम्यान, करोना विषाणू संसर्गाचं संकट देखील टळलेलं नाही. उत्तर कोरियात करोना संसर्गाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. उत्तर कोरियात करोना प्रतिबंधक लसीकरण झालं नसल्यानं धोका वाढला आहे.