क्रुरपणा; दहा महिन्याच्या चिमुरडीला लाथा अन् गोळ्यांचा पाऊस

श्रीनगर : जैश ए महंमदच्या दोन दहशतवाद्यांनी आईच्या कुशीत बसलेल्या अवघ्या दहा महिन्यांच्या चिमुरडीला लाथ घालून पाडले. विशेष पोलीस अधिकारी फयाझ अहमद भट (वय 50) यांच्या कुटुंबीयांनी पुलवामामध्ये दहशतवाद्यांच्या भयावह कौर्याचा रविवारी रात्री अनुभव घेतला.

हत्या केलेल्या भट यांच्या 21 वर्षीय कन्येचे गोळ्या लागून झालेल्या जखमांमुळे सोमवारी पहाटे निधन झाले. त्यांच्या आई-वडिलांची घराच्या दारातच गोळ्यांनी अक्षरश: चाळण करून हत्या करण्यात आली. तोंड झाकून एके 47 घेऊन आलेल्या अतिरेक्यांनी भट यांच्या घराचे दार ठोठावले. त्यांनी आत येताच भट यांच्यावर गोळ्यांचा पाऊस पाडला. त्यांची पत्नी राजबानो हे त्यांचे पुढचे लक्ष्य होते. त्यांची कन्या रफिका जान आईला वाचवण्यासाठी आली, पण तिच्याही नशिबी मरणच आले.

भट यांची सून सैमा आपल्या मुलाला खेळवत होती. तिला आणि त्या दहा महिन्यांच्या चिमुरडीला लाथा घातल्यानंतर ती पळून वेगळ्या खोलीत आली म्हणून क्रौर्याची ही करुण कहाणी समोर आली. सैमा सांगत होत्या, मी आमच्या आयुष्याची अक्षरश: भीक मागितली. पण त्यांना दयेचा पाझर फुटला नाही. त्यांनी माझ्या लेकरालाही सोडले नाही. त्यांनी माझ्या सासरकडच्या लोकांना मारल्यानंतर मी घाबरून माझ्या चिमुरडीला उचलले आणि पळत दुसर्‍या खोलीत आले. मी माझे हुंदकेही दाबून ठेवले होते. हल्लेखोर तेथून गेल्यानंतर मी रडू लागले.

 

एक जण पाकिस्तानी दहशतवादी
हल्लेखोरांपैकी एक जण कोशूर भाषेत (काश्मिरी) बोलत होता, तर दुसरा उर्दूत बोलत होता. जैशचे दहशतवादी या भागात आहेत, याची माहिती आम्हाला मिळाली होती. त्यावरून शोधमोहीम सुरू केली होती. हल्ल्यातील एक जण पाकिस्तानी दहशतवादी होता. त्याचे पुरावे मिळाले आहेत.
– विजय कुमार (पोलीस महासंचालक)

You May Also Like