उत्तराखंड सरकारचा निर्णय; चार धाम यात्रा स्थगित

नवी दिल्ली : उत्तराखंड सरकारने चारधाम यात्रेसाठी सोमवारी जारी केलेल्या कोविड मार्गदर्शक सूचनांमध्ये यात्रेचा पहिला टप्पा 1 जुलैपासून आणि दुसरा टप्पा 11 जुलैपासून सुरू होईल, असेही म्हटले होते. तसेच करोना निगेटिव्ह रिपोर्ट आवश्यक असल्याचे सरकारने म्हटले होते. मात्र, आता पुढील आदेश येईपर्यंत यात्रा स्थगित करण्यात आली आहे.

 

उत्तराखंडमधील चार धाम यात्रेसंदर्भात राज्य सरकारने यू टर्न घेतला आहे. उत्तराखंड सरकारने पुढील आदेश येईपर्यंत चार धाम यात्रा स्थगित केली आहे. उत्तराखंड उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सराकरने हा निर्णय घेतला आहे. यापूर्वी सोमवारी राज्य सरकारने चारधाम यात्रेसंदर्भात कोविड मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. 1 जुलैपासून यात्रा सुरू होईल, असेही सांगण्यात आले होते. त्यानंतर उत्तराखंड उच्च न्यायालयाने 7 जुलैपर्यंत यात्रेवर बंदी घातली होती.

न्यायालयाने दिली स्थगिती
कोविड महासाथीच्या काळात सुरू केलेल्या यात्रेदरम्यान यात्रेकरू व पर्यटक यांच्यासाठी राज्य सरकारने केलेल्या व्यवस्थांबाबत असमाधान व्यक्त करत मुख्य न्यायाधीश आर.एस. चौहान व न्या. आलोक कुमार वर्मा यांनी चमोली, रुद्रप्रयाग व उत्तरकाशी जिल्ह्यांच्या रहिवाशांना बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री व यमुनोत्री या तीर्थस्थळांना भेटीची परवानगी देणार्‍या निर्णयाला स्थगिती दिली. या तीन जिल्ह्यांच्या रहिवाशांसाठी चारधाम यात्रा खुली करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने 25 जूनला घेतला होता.

You May Also Like