धुळ्यात सोमवारी होणार उपमहापौरांची निवड

समाजवादी पार्टीच्या नगरसेविकेचा अर्ज दाखल
धुळे :
भाजपचे महापौर चंद्रकांत सोनार आणि उपमहापौर कल्याणी अंपळकर यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ 30 जूनला संपुष्टात येत आहे. महापौरपदाच्या आरक्षणप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल असल्याने त्यावर 12 जुलैला कामकाज असेल. त्यामुळे महापौरपद अंतिम निकाल लागेपर्यंत रिक्त राहण्याची शक्यता असेल. मात्र, उपमहापौरपदाची निवडप्रक्रिया सोमवारी पार पडणार आहे. उपमहापौर पद रिक्त होणार असल्याने पहिल्या दिवशी समाजवादी पार्टीच्या नगरसेविका अन्सारी फातिमा बी नुरूलअमिन (प्रभाग क्र.12) यांनी अर्ज सादर केला आहे.

दरम्यान, उपमहापौर पदाच्या निवडीचा कार्यक्रम जाहिर करण्यात आला आहे. यात नामनिर्देशन पत्र प्राप्त करून घेणे यासाठी दि.25 जुन ते दि.27 पर्यंत सकाळी 11 ते दुपारी 1 पर्यंत नगरसचिव यांचे कार्यालय येथे सुरू राहणार आहे. शासनाने पाच दिवसांचा आठवडा केल्याने शनिवार, रविवार मनपात सुटी असते. मात्र उपमहापौर पदाच्या निवडीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी आज शनिवार व उद्या रविवार सकाळी 11 ते दुपारी 1 पर्यंत या कालावधीत नगरसचिव कार्यालय खुले राहणार आहे. उपमहापौर पदासाठी दाखल करण्यात आलेल्या नामनिर्देशन पत्रांची छाननी दि.28 रोजी सभेचे कामकाज सुरू होताच करण्यात येणार आहे. तर माघार घेणेसाठी पंधरा मिनिटांचा अवधी देण्यात आला आहे.

राज्यात 27 महापालिका असून, त्यासाठी नोव्हेंबर 2019 मध्ये सोडत पद्धतीने आरक्षण काढण्यात आले. त्या वेळी चिठ्यांमध्ये सर्व जाती संवर्गाचा समावेश होता. त्यातून धुळे महापालिकेसाठी ओबीसी आरक्षण निघाले. शिवाय 27 महापालिकांपैकी अनुसूचित जातीला (एससी) तीन, अनुसूचित जमातीला (एसटी) एक, ओबीसी संवर्गाला सात, खुल्या प्रवर्गाला आठ, महिलांसाठी आठ जागांवर आरक्षण निघाले. याचा अर्थ सर्व जाती संवर्गाला आरक्षण मिळाले. त्यात धुळे महापालिकेचे ओबीसी आरक्षण रद्द केले तर अन्याय होईल, असा युक्तिवाद याचिकाकर्ते कर्पे, प्रतिभा चौधरी यांच्यातर्फे करण्यात आला आहे. त्यावर 12 जुलैला अंतिम कामकाजाची शक्यता असेल. परिणामी, खुल्या जागेमुळे महापौर झालेले श्री. सोनार यांचा 30 जूनला कालावधी संपुष्टात आल्यानंतर काय घडते याकडे सर्वांचे लक्ष आहे.

उपमहापौर पदासाठी शर्यत
धुळे महापालिकेत भाजपाने एकहाती सत्ता ताब्यात घेतल्यानतंर महापौर व उपमहापौर पद आपल्याकडेच ठेवले. महापौर पदाच्या निवडीसाठी न्यायालयीन कामकाजानतंर निर्णण घेतला जाईल. उपमहापौरपदाच्या शर्यतीत भाजपातील अनेक नगरसेवक असले तरी समाजवादी पार्टीच्या नगरसेविकेने पहिलेच नामनिर्देशन पत्र दाखल केल्यामुळे भाजपा व इतर पक्षांच्या भुवया उंचावल्या आहेत.

You May Also Like