देवगड : मुख्यमंत्री केवळ बाता मारतायत, इतर जिल्ह्यांमध्ये का जात नाहीत”: देवेंद्र फडणवीस

देवगड : अलीकडेच पश्चिम किनारपट्टीवर धडकलेल्या तौक्ते चक्रीवादळाने गोवा, महाराष्ट्र, गुजरात या राज्यांना मोठा तडाखा दिला. महाराष्ट्राबाबत बोलायचे झाले, तर कोकणाला या तौक्ते चक्रीवादळाचा मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी विविध प्रकारचे नुकसान झाले आहे. भाजपचे दोन्ही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही कोकणातील परिस्थितीचा आढावा घेतला. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ गुजरात दौरा केल्यावरून टीका केली जात आहे. यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले असून, मुख्यमंत्री इतर जिल्ह्यात का गेले नाहीत, असा सवाल फडणवीसांनी केला आहे.

भाजपच्या दोन्ही विरोधी पक्षनेत्यांनी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा करत तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी देवगड येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केल्या जात असलेल्या टीकेचा देवेंद्र फडणवीस यांनी समाचार घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी केवळ गुजरातमध्ये का गेले असा सवाल करता? मग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केवळ दोनच जिल्ह्यात का आले? इतर जिल्ह्यात का जात नाही?, अशी विचारणा देवेंद्र फडणवीस यांनी केली.

मुख्यमंत्री केवळ बाता मारत आहेत. पंतप्रधान मोदी गुजरातला गेले. ते गोवा आणि महाराष्ट्रात का गेले नाही? असा सवाल करण्यात येतोय. मग मुख्यमंत्रीही केवळ दोनच जिल्ह्यात का आले? वादळाचा फटका पुणे, कोल्हापूर, सातारा आणि सांगलीलाही बसला आहे. तिकडे मुख्यमंत्री का गेले नाहीत?, आम्हीही असाच सवाल करायचा का? अशी विचारणा करताना गतवर्षी निसर्ग चक्रीवादळावेळी सरकारनेही काहीही मदत केली नाही. मुख्यमंत्री केवळ राजकीय स्टेटमेटं करत आहेत, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

एकीकडे मुख्यमंत्री म्हणतात की राजकारण करू नका, पण दुसरीकडे प्रत्यक्षात टीका करतात. मुख्यमंत्र्यांचा दौरा किती तासांचा आहे. केवळ तीन तासांचा दौरा आणि किती किलोमीटरचा दौरा हे मोजून सांगू का?, अशी विचारणा करत वादळाची पूर्वसूचना असतानाही एनडीआरएफची टीम तैनात का ठेवण्यात आली नाही? कोकणात प्रचंड नुकसान झालं आहे. त्याचे पंचनामे कधी होणार? नुकसानग्रस्तांना मदत कधी मिळणार?, असे अनेकविध प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी उपस्थित केले.

You May Also Like