डॉक्टरांच्या प्रयत्नांनी शेतमजूर महिलेला मिळाले जीवदान म्युकोरमायकोसिसची जळगावात पहिली शस्त्रक्रिया यशस्वी

जळगाव : -येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे कोरोना सदृश व म्युकोरमायकोसिस आजाराने ग्रस्त असलेल्या शेतमजूर महिलेवर ऐतिहासिक पहिली शस्त्रक्रिया यशस्वीपणे गुरूवार दि. २७ मे रोजी पार पडली आहे. रुग्णालयात म्युकोरमायकोसिस आजाराच्या रुग्णावरील हि पहिलीच शस्त्रक्रिया होती. अत्यंत गुंतागुंतीची आणि चार तास चाललेल्या या शस्त्रक्रियेत महिलेचा जीव वाचवण्यात वैद्यकीय पथकाला यश आले आहे.

पाचोरा तालुक्यातील कोल्हे या लहानशा गावात पाटील परिवार राहतो. कर्ता पुरुष पक्षाघात आजाराने घरीच असतात. तर महिला दुसऱ्या शेतात जाऊन मजुरी करते. पाटील दाम्पत्याचे तिन्ही मुले शिक्षण घेत आहेत. त्यातील मोठी मुलगी हि कलाशाखेच्या द्वितीय वर्षात तर दोन मुले अनुक्रमे सहावी व पाचवीत आहे. त्यामुळे घराची जबाबदारी दोन्ही महिलांवरच येऊन पडली. त्यातच या ४३ वर्षीय महिलेला कोरोनाची बाधा झाली. या बाधेतून बुरशीच्या म्युकोरमायकोसिस आजाराची देखील लागण झाली. परिस्थिती हलाखीची असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात महिलेला २१ मे या तारखेला दाखल करण्यात आले.

म्युकोरमायकोसिसचे निदान करण्यासाठी वैद्यकीय पथकाने सूक्ष्मजीवशास्त्र विभागात नमुने पाठविले. तेथे अत्याधुनिक मायक्रोस्कोपीद्वारे विभाग प्रमुख डॉ. किशोर इंगोले यांनी रोगाचे निदान झाले. त्यानंतर आजाराची तीव्रता वाढत असल्याने त्यांना औषधवैद्यक शास्त्र विभागाच्या सहयोगी प्रा. डॉ. विजय गायकवाड, डॉ.आस्था गणेरीवाल यांच्या निगराणीखाली कक्ष क्रमांक ७ मध्ये ठेवण्यात आले. मात्र शस्त्रक्रियेची गरज होती. अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, म्युकोरमायकोसिस कृती दलाचे अध्यक्ष तथा उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे यांनी ८ विभागातील प्रत्येकी दोन डॉक्टरांची मिळून शस्त्रक्रियेसाठी १८ जणांची टीम बनवली. गुरुवारी सकाळी ९ वाजून ३० मिनिटांनी महिलेला शस्त्रक्रिया विभागात घेण्यात आले.

म्युकोरमायकोसिसच्या या पहिल्याच शस्त्रक्रियेत या ४३ वर्षीय महिलेचा वरचा जबड्याच्या भागावर शस्त्रक्रिया करून काळी बुरशी काढून टाकण्यात आली. डोळा व मेंदूकडे पसरण्याआधीच हि शस्त्रक्रिया वेळेत झाली. त्यामुळे दोन्ही अवयव वाचले. महिलेला द्रवपदार्थद्वारे जेवणासाठी पोटाला छिद्र पडून नळी टाकून व्यवस्था करण्यात आली. शस्त्रक्रियेत कान नाक घसा विभागाचे डॉ. अक्षय सरोदे, दंतशल्यचिकित्सा विभागाचे डॉ. इम्रान पठाण, डॉ. श्रुती शंखपाळ, नेत्रशल्यचिकित्सा विभागाचे डॉ. प्रसन्ना पाटील, शल्यचिकित्सा विभागाचे डॉ. मिलिंद चौधरी, डॉ. उमेश जाधव, डॉ. विपीन खडसे, बधिरीकरणशास्त्र विभागाचे डॉ. संदीप पटेल, डॉ. स्वाथी एम., डॉ. काजल साळुंखे, डॉ. स्वप्नील इंकणे, डॉ. अनिल पाटील, अधिपरिचारिका माधुरी महाजन, ज्योत्स्ना निंबाळकर, नजमा शेख यांनी सहभाग घेतला.

शास्त्रक्रियेनंतर तपासणीसाठी नमुने सूक्ष्मजीवशास्त्र व विकृतीशास्त्र विभागात पाठविण्यात आले आहे. महिलेला अतिदक्षता विभागात निरीक्षणासाठी ठेवण्यात आले आहे. शस्त्रक्रिया झाल्यावर अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत देवरे, डॉ. विजय गायकवाड यांनी भेट देऊन महिलेच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच शस्त्रक्रिया करून महिलेचा जीव वाचविणाऱ्या वैद्यकीय पथकाचे कौतुक केले. संबंधित महिलेच्या नातेवाईकांनी रुग्णालयाच्या पथकाचे आभार मानले आहे. संबंधित महिलेचा वैद्यकीय खर्च हा महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून करण्यात आल्यामुळे शस्त्रक्रिया हि विनामूल्य झाली आहे. यासाठी रुग्णालयातील योजनेच्या कार्यालयातील नोडल अधिकारी डॉ. अलोक यादव व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

“कोरोना सदृश आजार व त्यात म्युकोरमायकोसिस झाल्यामुळे पाटील परिवार चिंतीत झाला होता. मात्र त्यांना धीर देत, संबंधित महिलेचा शस्त्रक्रियेद्वारे जीव वाचविला आहे. सर्व वैद्यकीय पथकाचे कौतुक आहे. जळगावचे हे शासकीय महाविद्यालय व रुग्णालय आता अद्ययावत झाले असून रुग्णांना दिलासा देण्याचे कार्य करीत आहे.”

You May Also Like