चाळीसगाव येथे आढळून आला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अस्थिकलश

चाळीसगाव । येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात पुतळ्याच्या नूतनीकरणाचे काम सुरु असताना खोदकाम करतांना पुतळ्याच्या सुमारे दहा ते बारा फूट खाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अस्थिकलश आढळून  आला. या अस्थिकलशाचे पावित्र्य जपत तो अस्थिकलश पुन्हा नवीन पुतळ्याच्या ठिकाणी त्याच पद्धतीने ठेवण्यात येणार आहे.

 

याबाबत, समता सैनिक दलाचे राष्ट्रीय संघटक धर्मभूषण बागूल म्हणाले कि, नगरसेविका सायली जाधव व रोशन जाधव यांच्या पुढाकाराने शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात पालिकेच्या माध्यमातून सध्या नुतनीकरणाचे काम सुरु आहे. ज्या ठिकाणी डॉ. आंबेडकरांचा पुतळा होता; त्या पुतळ्याच्या ठिकाणी खोदकामादरम्यान अस्थिकलश मिळून आला असल्याचे त्यांनी सांगितले.

भैय्यासाहेबांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आणल्या होत्‍या अस्‍थी

ज्या विषयी आपले वडील स्वातंत्र्य सैनिक स्व. भगवान शंकर बागूल यांनी त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या दस्तावेजानुसार तसेच त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा ६ डिसेंबर १९५६ ला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण झाले होते. त्यानंतर मुंबईत ९ डिसेंबरला चैत्यभूमीवर अंत्यसंस्कार करण्यात आले आणि १० डिसेंबरला त्यांच्या अस्थिविसर्जनासाठी भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली जमलेल्या हजारो नागरिकांनी मुंडण केले. त्यात चाळीसगाव येथील आंबेडकरी नेते श्‍यामा जाधव, दिवाण चव्हाण यांच्यासह डॉ. आंबेडकरांना मानणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांचा समावेश होता. या सर्वांनी भैय्यासाहेबांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थी कलशात चाळीसगावला आणल्या.

 

 

दरम्यान, १९५८ साली जेव्हा हा पुतळ्या उभारण्यात आला, त्यावेळी त्यांनी अस्थिकलश पुतळ्याखाली जपून ठेवला होता. तो आज खोदकाम करताना आढळून आला. तो पुन्हा पूर्वी होता तसा नवीन पुतळ्याखाली ठेवून आमच्या पूर्वजांचा हा वारसा जपणार असल्याचे बागूल यांनी सांगितले.  तसेच अस्थिकलशाची माहिती मिळताच तहसीलदार अमोल मोरे, पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली.

You May Also Like