करोना रुग्णाचा स्वच्छतागृहात मृत्यू झाल्याने खळबळ

नाशिक : “अरे, या बिटकोला आई-बाप आहे का नाही? हॉस्पिटल आहे का यमपुरी? अधिकारी, नेते नुसत्याच भेटी देतात का? कोणी न्याय देतं का न्याय? गरीबांनी असच तडफडून तडफडून मरायच का?” नातेवाईकांचा हा आर्त टाहो दाही दिशा व आकाश भेदून टाकत आहे.

याला कारण आहे बिटकोतील हृदय पिळवटून टाकणारी घटना. मालेगावच्या चिंतामण मोरे (वय 51) या करोना रुग्णाचा स्वच्छतागृहात मृत्यू झाल्याने घडल्याने खळबळ उडाली. मोरे हे तिस-या मजल्यावरील मेडिकल वॉर्डमध्ये गेल्या काही दिवसांपासून उपचार घेत होते. रविवारी (ता.२) दुपारी साडेबारा-एकच्या सुमारास ते कॉमन बाथरुममध्ये गेले. त्यांच्या हातात पाण्याची बाटलीही होती. आँक्सिजन पातळी कमी झाल्याने चक्कर येऊन ते तेथेच कोसळले. कर्मचारी नसल्याने तास-दोन तास मृतदेह बाथरुम मध्येच पडुन होता. त्यांना उचलण्यासही कुणी धजावत नव्हते. थोड्यावेळाने कर्मचारी आले व त्यांनी मृतदेह उचलला. या घटनेमुळे रुग्णांमध्ये भितीचे वातावरण आहे. तेथील आरोग्य कर्मचा-यांना विचारले असता, बाथरूम, पॅसेजमध्ये पडून असे अनेक जण गेल्याचे त्यांनी खेदाने नमूद केले. झाकीर हुसेनसारखी दुर्घटना घडूनही प्रशासन बोध घेत नसल्याचे दिसून येते.

का घडतायत घटना?

बिटकोत पूर्वी करोना मृत्यू दर तीन-चार होता. आता रोज दहा-बारा मृत्यू होत आहेत. हे रोजचेच झाल्याने आज दहा विकेट गेल्या, बारा गेल्या असे कर्मचारी बोलतात. मृत्यू दर वाढीचे मुख्य कारण येथे एकच फिजीशियन आहे. स्त्री व पुरुष कक्षासाठी, रुग्णांच्या दैनंदिन तपासणीसाठी पुरेशा संख्येने फिजिशियन व डॉक्टरांची नियुक्ती महत्वाची आहे. कर्मचारी कमी असल्याने नातेवाईकच करोना रुग्णांना दवा,चहा-पानी, नाश्ता-जेवण देत होते. काळजी घेत होते. त्यामुळे रुग्ण लवकर बरा होत होता. कर्मचारी संख्या न वाढवताच चार दिवसांपासून नातेवाईकांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. पंतप्रधान योजनेतील सुमारे शंभर मशिन धुळखात खोलीत पडुन आहेत. अशी यंत्रे, साधने त्वरित उपयोगात आणली जात नाहीत. एकाच लिफ्टमधून करोना रुग्ण, मृतदेह, कर्मचारी वाहतूक होते. या सर्व कारणांमुळे डेथ रेट वाढला आहे.

कॉटवरच मृतदेह

कॉटवर तासंतास पडलेले मृतदेह, नातेवाईकांचा हंबरडा यामुळे बरे होत असलेल्या रुग्णांचे खच्चीकरण होत आहे.अद्यावत शवागाराची निर्मिती करुन मृतदेह त्वरित तेथे हलवावेत, अशी मागणी आहे. साडेसातशेवर रुग्ण संख्या गेल्याने जुन्या बिटकोतून आलेली शंभर कर्मचा-यांची कुमकही अपुरी पडत आहे. रुग्णालयातील महत्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. रुग्णालयात प्रशिक्षित व कुशल वैद्यकीय कर्मचारी संख्या वाढविणे गरजेचे आहे. कमालीचा धोका, कामाचे जादा ताण आणि सहा महिन्यांपासून पगार नाही, यामुळे त्यांचे मनोबल खालावत आहे

अस्वच्छतेचे आगार

तोकड्या मनुष्यबळा अभावी बिटको करोना रुग्णालय अस्वच्छतेचे आगार झाले आहे. प्रत्येक मजला व तळघरात कच-याचे ढीग साचलेले आहेत. कर्मचा-यांनी करोना रुग्णांवर उपचार करुन फेकलेले ग्लोव्हज, वैद्यकीय कचरा पडलेला आहे. रुग्णांनी वापरलेल्या चादरी, उशा, घरगुती कपडे प्रत्येक मजल्यावर पडून आहेत. अनेक बेडवर गाद्यांची थप्पी लागली आहे. साफसफाई नीट होत नाही. दुर्गंधी व अस्वच्छतेने कळस गाठल्याने रुग्ण व कर्मचा-यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. स्वच्छता ठेकेदाराचा ठेका तत्काळ रद्द करुन जबाबदार ठेकेदाराची नियुक्ती करावी अशी मागणी होत आहे.

ऑक्सिजन दुर्घटना?

काही दिवसांपूर्वी महापालिकेच्या झाकिर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन प्रकल्पाला गळती होऊन 24 रुग्णांचा तडफडून मृत्यू झाल्याने देश हादरला होता. झाकिर हुसेन रुग्णालयापेक्षा दुप्पट मोठा ऑक्सिजन प्रकल्प व तिप्पट रुग्णसंख्या बिटकोत आहे. ऑक्सिजन निर्मिती करताना प्रकल्पावर बर्फाचा भलामोठा थर साचतो. त्यावर अग्नीशामक दलाने पाण्याचा मारा करणे आवश्यक आहे. मात्र, तसे पत्र किंवा स्पष्ट सूचना नसल्यामुळे अग्नीशमन दल धोका पत्कारायला तयार नसल्याचे समजते. प्रकल्पाची नियमित देखरेख, देखभाल आवश्यक आहे. अन्यथा झाकिर हुसेनपेक्षा मोठी दुर्घटना घडू शकते.

बंद करा हे दौरे

गेल्या आठवड्यात माजी मुख्यमंत्री व नंतर आयुक्तांनी दोनदा भेट देऊनही बिटकोत अशा घटना घडतच असल्याने संताप व्यक्त होत आहे. आजी-माजी पालकमंत्री, महापौर, जिल्हाधिकारी, मंत्री, स्थायीचे सभापती, नाशिकरोडचे सभापती, आमदार, खासदार बिटकोचे दौरे करुन अधिका-यांना धारेवर धरत आहेत. काहीजण चमकोगिरीच करतात. ठोस उपाययोजना कोणीच करत नाही. त्यामुळे हे दौरे थांबवेत अशी मागणी होत आहे.

आमच्या व्हॉटस्अ‍ॅप गृपला जॉईन होण्यासाठी ब्लू लाईनला टच करा

https://chat.whatsapp.com/C2lBmNXGceHGLS7IeE

You May Also Like