”निवडणुका एकत्र लढायच्या, की वेगवेगळ्या? याचा निर्णय आघाडीतील वरिष्ठ घेतील”

पुणे : पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघ निवडणूक प्रचारार्थ बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यामध्ये पवार बोलत होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढायच्या, की वेगवेगळ्या? याचा निर्णय महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेते घेतील. त्यामुळे कोणीही डोकी खाजवत विचार करत बसू नका, असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिला.

तसेच ,पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या दोन्ही उमेदवारांना विजयी करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करा. शिवसेना आणि कॉंग्रेसला बरोबर घेऊन त्यांचा मानसन्मान ठेवा. ही निवडणूक झाल्यावर आपल्याला २०२२ च्या महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागायचे आहे. मधल्या काळात एक लाट आली आणि त्यामध्ये आपल्याला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.

मात्र, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत वडगावशेरी आणि हडपसर या मतदारसंघात आपल्याला यश आले, तर खडकवासला मतदारसंघात थोडक्‍यात संधी हुकली. जोपर्यंत कार्यकर्ता पदावर बसत नाही, तोपर्यंत संघटना मजबूत होत नाही. त्यामुळे आगामी निवडणुकीत काही अनुभवी उमेदवारांसह तरुणांना संधी देणार आहे. त्यामुळे वॉर्ड कसे होतील, त्याकडे जास्त लक्ष न देता पक्ष बांधणीला सुरुवात करा. येत्या काही दिवसांत संघटना स्तरावर काही बदल केले जातील, असे संकेत पवार यांनी यावेळी दिले.

यावेळी राज्याचे मंत्री दिलीप वाळसेपाटील, पदवीधरचे उमेदवार अरुण लाड, शिक्षक मतदार संघांचे उमेदवार जयंत आसगावकर, खासदार अमोल कोल्हे, ऍड. वंदना चव्हाण, प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, शहर अध्यक्ष व आमदार चेतन तुपे, आमदार सुनील टिंगरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्‍ते अंकुश काकडे, महापालिका विरोधी पक्षनेते दीपाली धुमाळ, नगरसेवक दीपक मानकर, रवींद्र माळवदकर यासह नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेट्साठी आमच्या  फेसबुक पेज  आणि  टि्वटरवर आम्हाला फॉलो करा

आमच्या व्हॉटस्अ‍ॅप गृपला जॉईन होण्यासाठी ब्लू लाईनला टच करा

https://chat.whatsapp.com/C2lBmNXGceHGLS7IeElqI6

You May Also Like