अर्थमंत्र्यांची घोषणा; करोनाच्या पार्श्वभूमीवर नव्या योजना जाहीर!

नवी दिल्ली : देशातील सामान्यांना आणि त्यासोबतच छोट्या उद्योजकांना, कर्जदारांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी केंद्राकडून याआधीही योजना जाहीर केल्या असताना आज पुन्हा एकदा केंद्र सरकारने आरोग्य क्षेत्रासोबतच एकूण 8 क्षेत्रांसाठी नव्या योजना जाहीर केल्या आहेत. त्यामध्ये आरोग्य सुविधेसाठी 50 हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे.

कोविड प्रभावित क्षेत्रांसाठी 1 लाख 1 हजार कोटींच्या क्रेडिट गॅरंटी योजनेची घोषणा करण्यात आली आहे. त्यापैकी करोना काळात आव्हान निर्माण झालेल्या आरोग्य क्षेत्राला पाठबळ देण्यासाठी केंद्र सरकारने घोषणा केली आहे. आरोग्य क्षेत्रासाठी 50 हजार कोटींची घोषणा करण्यात आली आहे. या निधीचा वापर आरोग्यविषयक सुविधांच्या उभारणीसाठी होणार. याव्यतिरिक्त इतर विभागांसाठी 60 हजार कोटींची घोषणा करण्यात आली आहे.

गेल्या वेळी आत्मनिर्भर रोजगार योजनेअंतर्गत जाहीर करण्यात आलेल्या घोषणेनुसार ज्या कंपन्यांची कर्मचारी संख्या 100च्या आत आहे आणि नव्याने नोकरीवर ठेवण्यात येणार्‍या कर्मचार्‍यांचा महिना पगार 15 हजारपर्यंत आहे, अशा कर्मचार्‍यांचा 12 टक्के पीएफचा हिस्सा आणि अशा कंपन्यांचा पीएफमधील 12 टक्के असा एकूण 24 टक्के पीएफचा हिस्सा हा केंद्र सरकारकडून भरला जाईल. आता या योजनेची मर्यादा पुढे वाढवत 30 जून 2021 पासून 31 मार्च 2022 पर्यंत करण्यात आली आहे.

भारतात येणार्‍या पहिल्या 5 लाख परदेशी व्यक्तींना व्हिसा शुल्क द्यावं लागणार नाही. व्हिसा देण्यास सुरुवात झाल्यानंतर 31 मार्च 2022 पर्यंत ही योजना लागू असेल. यामुळे पर्यटन क्षेत्राला मोठा फायदा होईल. एका पर्यटकाला किंवा परदेशी व्यक्तीला एकदाच या योजनेचा फायदा घेता येईल. या योजनेमुळे सरकारी तिजोरीवर 100 कोटींचा भार पडणार आहे.

दरम्यान, देशातील पर्यटन व्यवसाय वाढवण्यासाठी करोना काळात रोजगार गेलेल्या पर्यटन व्यवसायातील लोकांना वैयक्तिक कर्ज किंवा भांडवल उपलब्ध करून दिलं जाईल. यामध्ये, केंद्रीय पर्यटन विभाग आणि राज्य सरकारांची मान्यताप्राप्त 10 हजार 700 टूरिस्ट गाईडला लाभ होईल. या योजनेअंतर्गत 10 लाखांपर्यंतचं लोन ट्रॅव्हल अ‍ॅड टूरिजम स्टेकहोल्डर्स अर्थात ढढड ला तर 1 लाख रुपयांपर्यंतचं लोन टूरिस्ट गाईडला उपलब्ध करण्यात येईल. यासाठी कोणत्याही प्रकारची प्रोसेसिंग फी आकारली जाणार नाही.

 

ताज्या बातम्यांच्या अपडेट्साठी आमच्या  फेसबुक पेजला  आणि  टि्वटरवर  आम्हाला फॉलो करा…

ताज्या बातम्यांच्या अपडेट्साठी आमच्या व्हॉटस्अ‍ॅपला जॉईन व्हा…

https://chat.whatsapp.com/GdbPgC62cnKHS4YUh0x6LE

You May Also Like