दुसरी लाट यशस्वीपणे हाताळणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पहिली पसंती

मुंबई : करोनाच्या दुसर्‍या लाटेचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला होता. याशिवाय सर्वाधिक रुग्णसंख्याही महारातूनच समोर येत होती. परंतु आता राज्यात मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्येत घट होत आहे. करोनाच्या दुसर्‍या लाटेदरम्यान सर्वोत्तम कामगिरी करणारे मुख्यमंत्री कोण असा पोल ज्येष्ठ पत्रकार प्रभू चावला यांनी ट्विटरच्या माध्यमातून घेतला होता. प्रभू चावला यांनी घेतलेल्या पोलनुसार राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करोनाच्या दुसर्‍या लाटेदरम्यान चांगल्या प्रकारे परिस्थिती हाताळली आहे असा कल देण्यात आला आहे. उद्धव ठाकरे यांना 62 टक्क्यांपेक्षा अधिक मते मिळाली. शिवसेना समर्थकांकडून या पोलचा स्क्रीनशॉट सध्या व्हायरल करण्यात येत आहे.

या पोलच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कोरोनाच्या दुसर्‍या लाटेदरम्यान चांगली कामगिरी करणारे मुख्यमंत्री ठरल्याचं शिवसेना समर्थक सोशल मीडियाद्वारे म्हणत आहेत.
पहिल्या पोलमध्ये तब्बल 2,67,248 जणांनी आपलं मत नोंदवलं. तर दुसर्‍या पोलमध्ये 2,34,261 जणांनी आपलं मत नोंदवलं. पहिल्या पोलमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 62.5 टक्के, तर योगी आदित्यनाथ यांना 31.6 टक्के, पिनराई विजयन यांचा 1.3 टक्के आणि अरविंद केजरीवाल यांना 4.6 टक्के मतं मिळाली. तर याच प्रश्नावर आधारित असलेल्या दुसर्या पोलमध्ये शिवराज सिंह चौहान यांना 49 टक्के, तर नवीन पटनायक यांना 48.8 टक्के मतं मिळाली. कॅप्टन अमरिंदर सिंग यांना 1.7 आणि बी.एस.येडियुरप्पा यांना 0.5 टक्के मतं मिळाल्याचं दिसून आलं आहे.

देशभरात कोणत्या मुख्यमंत्र्यांनी करोनाच्या दुसर्‍या लाटेदरम्यान चांगल्या पद्धतीनं नियोजन केलं? असा प्रश्न प्रभु चावला यांनी ट्विटरच्या पोलद्वारे विचारला होता. त्यांनी दोन पोलद्वारे आठ मुख्यमंत्र्यांची नावं निवडली होती. यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केरचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, मध्य प्रदेशचे शिवराज सिंह चौहान, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक आणि कर्नाटकचे बी.ए. येडियुरप्पा यांचा समावेश करण्यात आला होता. त्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाजी मारली असल्याचे दिसुन येते.

You May Also Like