देशात पहिल्यांदाच कोरोनाच्या विक्रमी 3.32 लाख नवे रुग्ण

नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येचा रोज नवीन विक्रम होत असून गुरुवारी 3.32 लाख नव्या रुग्णांची भर पडली आहे तर 2263 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. भारताने रोजच्या कोरोना रुग्णांच्या वाढीबाबत आता अमेरिकेलाही मागे टाकलं आहे. गुरुवारची कोरोना रुग्णसंख्या ही जगातील कोरोना रुग्णसंख्येच्या वाढीचा एक विक्रम आहे. गुरुवारी देशात 1,93,279 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. त्या आधी बुधवारी देशात 314,835 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली होती तर 2104 रुग्णांनी जीव गमावला होता.

देशातील वाढती रुग्णसंख्या ही चिंताजनक असून त्यामुळे देशातल्या आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण येत आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अनेक महत्त्वाच्या बैठका सुरु आहेत. पंतप्रधान मोदी आज पुन्हा एकदा कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर तीन प्रमुख आढावा बैठका घेणार आहेत. सध्या देशात सर्वाधिक कोरोनाचा प्रादुर्भाव महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये पाहायला मिळत आहे. या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदी वर्च्युअल माध्यमातून बैठक घेणार आहेत. या बैठकीत ते कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आढावा घेऊन काही उपाययोजनांवर चर्चा करणार आहेत.

देशातील आजची कोरोना स्थिती :
एकूण कोरोनाबाधित रुग्ण : एक कोटी 62 लाख 63 हजार 695
एकूण कोरोनामुक्त रुग्ण : एक कोटी 36 लाख 48 हजार 159
एकूण अॅक्टिव्ह रुग्ण : 24 लाख 28 हजार 616
कोरोनामुळे आतापर्यंत झालेले एकूण मृत्यू : 1 लाख 86 हजार 920
देशात आतापर्यंत लसीकरणाची आकडेवारी : 13 कोटी 54 लाख 78 हजार 420 डोस

You May Also Like

error: Content is protected !!